विक्रोळी येथील खोपडी कांडाची आठवण करून देणाऱ्या मालवणी विषारी दारू प्रकरणी आठ पोलिसांना निलंबित केल्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने मालवणी उत्पादन शुल्क कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांसह चौघांना निलंबित केले आहे. या दारूकांडानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक सक्रिय झाले असून स्पिरीटचा साठा पकडण्याची मोहिम सुरू केली आहे.
मालवणीतील संबंधित दारू अड्डा हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापासून काही अंतरावर आहे. बेकायदेशीररीत्या हा अड्डा सुरू होता. या अड्डय़ावर आतापर्यंत पाचवेळा कारवाई झाली होती. या अड्डयाची मालकीण असलेली नैनिकबाई स्वामी हिला डिसेंबर २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मालाड-मालवणी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत ११७ वेळा विविध अड्डय़ांवर कारवाई केली आहे. तरीही छुपेपणे गावठी दारूचे हे अड्डे सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मालवणीतील विषारी दारूप्रकरणी प्रकरणी मालवणी विभागाचे निरीक्षक जगदीश देशमुख, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे तसेच शिपाई वर्षां वेंगुर्लेकर, धनाजी दळवी या चौघांना निलंबित करण्यात आले आहे. गावठी दारूंच्या अड्डय़ांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यत आला आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त शामसुंदर शिंदे यांनी सांगितले.
गावठी दारूच मिथेनॉलचे प्रमाण अधिक आढळल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. मिथेनॉल, इथेनॉल तसेच स्पिरीटचा वापर करून गावठी दारू तयार केली जाते. हे प्रमाण जास्त झाले तर व्यक्ती दगावू शकते. देशी दारूसाठी किमान ५० रुपये मोजावे लागतात. परंतु गावठी दारू २० ते २५ रुपयांत मिळते. ही गावठी दारू परराज्यातून आणली जाते. मात्र ती अधिक स्वस्तात विकण्यासाठी २०/२२ रुपये लिटरने मिळणारे मिथेनॉल वापरले जाते. गावठी दारूत प्रामुख्याने १६ ते १७ टक्केच अल्कोहोल असते. परंतु मिथेनॉल मिसळल्यामुळे अल्कोहोलचे प्रमाण ९५ टक्के होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.