साकीनाका येथील चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी तसेच नंतर तिची निर्घृण हत्या करून पुराव्यांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी नाझिर शेख याला विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात नाझिरला मदत केल्याप्रकरणी त्याचा मालक विनोद मेहेर यालाही न्यायालयाने दोषी धरत तीन वर्षांचा कारावास सुनावला.
ही घटना १ जानेवारी २०१२ रोजी घडली होती. ही मुलगी घराबाहेर खेळत होती. बराच वेळ ती परत न आल्याने वडिलांनी साकीनाका पोलीस ठाणे गाठत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी विलेपार्ले येथे तिचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांकडून वडिलांना समजले होते.