वेष्टनासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागणाऱ्या विविध उत्पादनांच्या कंपन्यांनी या प्लास्टिकचे व्यवस्थापन-पुनर्वापरासाठी काम करावे, असा आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बिस्लरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, हल्दीराम, कोका कोला, कॅडबरी, पेप्सी, पारले आदी कंपन्यांना दिला.

विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच ऑल इंडिया प्लास्टिक उत्पादन संघटना, ग्रेटर मुंबई पेट बॉटल पॅकेजिंग असोसिएशनसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली.

प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी घातली असली तरी विविध प्रकारची पेये, पाण्याच्या बाटल्या आदी उत्पादनांच्या वेष्टनामध्ये प्लास्टिकच्या वापरास संमती आहे. ग्राहकांकडून या उत्पादनांचा वापर झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न आता आपल्यासमोर आहे. या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.