डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या मनिष नागोरी याच्यासह विकास खंडेलवाल या दोघांना अटक केली असून या दोघांचा हत्या प्रकरणात थेट संबंध सिद्ध होत नसला तरी पिस्तुलविषयक तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालामुळे ते तांत्रिकदृष्टय़ा आरोपी ठरले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली. त्याच दिवशी दुपारी ठाण्यात नागोरी आणि खंडेलवालला इतर साथीदारांसह अटक झाली. त्याच्याकडे ७.६५ एमएम हे एक पिस्तुल सापडले होते.
डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पुंगळ्याही अशा प्रकारच्या पिस्तुलाशी संबंधित होत्या. त्यामुळे त्यांच्यावर सुरुवातीपासून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचा संशय होता. परंतु परिस्थितीजन्य पुरावे सापडत नव्हते. त्याला शस्त्रास्त्र कायद्याखाली ताब्यात घेऊन दहशतवादविरोधी पथकाने तब्बल ४० हून अधिक पिस्तुलांची माहिती मिळविली. कोल्हापूर, सांगली, सातारा आदी ठिकाणी झालेल्या हत्या प्रकरणात त्यानेच पिस्तुल पुरविले होते, अशी माहितीही हाती आली होती.
डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पुंगळ्या आणि नागोरीजवळ सापडलेले पिस्तुल यांच्याबाबत तज्ज्ञांचा अहवाल मिळताजुळता होता. या मुद्दय़ावर त्याला आधीच अटक करता आली असती. परंतु इतर पुरावे सापडत नव्हते. त्यामुळे त्याला त्यावेळी दहशतवादविरोधी पथकाने अटक केली नव्हती. पिस्तुलविषयक तज्ज्ञांना अहवाल मिळाल्यानंतर तो पुणे पोलिसांकडे सोपविण्यात आला. या अहवालाच्या आधारे तांत्रिकदृष्टय़ा नागोरी आरोपी ठरू शकतो, असे स्पष्ट झाल्यानंतरच त्याला अटक करण्यात आली असावी, असे दहशतवादविरोधी पथकातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची कबुली देण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारीया यांनी २५ लाख देऊ केल्याचा आरोप नागोरीने न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी केला असावा,असेही सूत्रांनी सांगितले.