महाराष्ट्रात ‘वन्स मोअर’ या शब्दाला खूप मोठी परंपरा आहे. बालगंधर्व किंवा दीनानाथ मंगेशकर यांचे पद सुरू झाले की, संगीत नाटकांचे दर्दी प्रेक्षक ‘वन्स मोअर’ देण्यासाठी सरसावून बसत. आजही गाणे चांगले रंगले की, ‘वन्स मोअर’ हमखास दिलाच जातो. मात्र एखाद्या संपूर्ण कार्यक्रमाला ‘वन्स मोअर’ मिळण्याची ऐतिहासिक घटना शुक्रवारी घडली. निमित्त होते ‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाचे! ‘ती’च्या विजयासाठी’ साजऱ्या होणाऱ्या ‘व्हिवा लाऊंज’च्या ११व्या पर्वात मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर संवाद साधण्यासाठी आल्या. त्यांचे मार्गदर्शनपर विचार ऐकण्यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीबाहेर एवढी गर्दी झाली होती की प्रेक्षकांचे दोन गट करून मनीषा म्हैसकर यांना दोन वेळा संवाद साधावा लागला.
‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाने पहिल्या पर्वापासूनच ‘लोकसत्ता’च्या वाचकांबरोबरच इतरांचीही उत्सुकता चाळवली. याआधी सोनाली बेंद्रे, सुप्रिया सुळे, अंजली भागवत, आरजे मलिष्का, बेला शेंडे, गौरी शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, ऊर्मी जुवेकर, आरती अंकलीकर-टिकेकर, स्नेहा खानवलकर अशा विविध क्षेत्रांतील ‘अचिव्हर्स’सह संवाद साधण्याची संधी लाऊंजच्या माध्यमातून वाचकांना मिळाली आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला. मात्र शुक्रवारी सनदी अधिकारी असलेल्या मनीषा म्हैसकर यांच्या वाटचालीबद्दल, संघर्षांबद्दल आणि स्पर्धा परीक्षांबाबत त्यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठय़ा संख्येने गर्दी केली.पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साडेतीन वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी दुपारी दोन वाजल्यापासूनच प्रेक्षकांनी जागा पकडून ठेवल्या होत्या. त्याशिवाय मोठय़ा संख्येने प्रेक्षक आत प्रवेश मिळवण्यासाठी मिनी थिएटरबाहेर गर्दी करून उभे होते. आत बसलेल्या प्रेक्षकांशी दोन तास मुक्त संवाद साधल्यानंतर केवळ पाचच मिनिटांची विश्रांती घेत म्हैसकर यांनी पुन्हा नव्याने समोर आलेल्या प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. सनदी सेवेत येण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या छोटय़ा छोटय़ा शंकांचेही निरसन करत म्हैसकर यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले. प्रेक्षकांच्या या ‘वन्स मोअर’ प्रतिसादामुळे आपणही भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई : एखाद्या संपूर्ण कार्यक्रमाला ‘वन्स मोअर’ मिळण्याची ऐतिहासिक घटना शुक्रवारी घडली. निमित्त होते ‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाचे! ‘‘ती’च्या विजयासाठी’ साजऱ्या होणाऱ्या ‘व्हिवा लाऊंज’च्या  ११ व्या पर्वात मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर संवाद साधण्यासाठी आल्या. त्यांचे मार्गदर्शनपर विचार ऐकण्यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीबाहेर एवढी गर्दी झाली होती की प्रेक्षकांचे दोन गट करून मनीषा म्हैसकर यांना दोन वेळा संवाद साधावा लागला.

आताच्या पिढीसमोर अनेक प्रलोभने आहेत. दूरचित्रवाणीवर आज चारशेहून अधिक वाहिन्या आहेत. मायाजालाने तरुणाईला वेढले आहे. ‘व्हॉट्स अ‍ॅप’सारख्या गोष्टींमध्ये आज खूप वेळ वाया घालवला जातो. ही प्रलोभने टाळून यशाचा ध्यास घेण्याची गरज आहे.    – मनीषा म्हैसकर

सभागृहाच्या आसनमर्यादेमुळे अनेकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आले नाही, तसेच काही जणांना गैरसोयींनाही तोंड द्यावे लागले, त्याबद्दल ‘लोकसत्ता’तर्फे दिलगिरी.