मंत्रालयातील सांस्कृतिक विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रिती अत्राम धुर्वे असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून आजारपणातही बळजबरीने निवडणुकीचे काम केल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढावल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली. तर मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रिती यांना 18 एप्रिल रोजी कावीळ झाली होती. त्यानंतर त्यांनी रजेसाठी संबंधित ठिकाणी अर्जदेखील केला होता. परंतु त्यांची रजा मंजूर झाली नाही. कावीळ झाली असतानाही त्यांना उन्हात काम करावे लागल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मतदानाच्या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, असेही कुटुंबीयांनी सांगितले.

दरम्यान, आजारी असतानाही काम करून घेण्यात आल्याचा आरोप प्रिती यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत देखील करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पहा व्हिडिओ

 

मुंबई शहर जिल्हाधिका शिवाजी जोंधळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत, प्रिती यांनी आजारी असल्याचे कार्यालयाला कळवले असते तर त्यांची नियुक्ती रद्द केली असती, असे सांगितले. मतदान सुरू असताना प्रिती यांनी दुपारी 12 च्या सुमारास क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तब्येत बरी नसल्याची तक्रार करत घरी सोडण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना रेल्वे स्थानकापर्यंतही पोहोचवले. त्यानंतर त्यांना ट्रेनमध्ये त्रास झाल्याने कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. माहिती मिळाल्यानंतर त्वरित निवडणूक अधिकारी, उप-जिल्हाधिकारी यांनी रूग्णालयात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संपूर्ण शासन त्यांच्या दु:खात सहभागी असून कर्तव्य बजावत असताना ही घटना घडल्याने अशा वेळी देण्यात येणाऱ्या 15 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.