पालिका रुग्णालयांत अनेक वैद्यकीय पदे रिक्त; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात अधोरेखित

मुंबई : गंभीर प्रकृतीच्या करोनाग्रस्तांकरिता अतिदक्षता विभागात मनुष्यबळ कुठून आणावे, असा प्रश्न पालिकेसमोर ठाकला असतानाच महानगरपालिका रुग्णालयामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ६२ टक्के पदे आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची ४४ टक्के पदे रिक्त असल्याचे ‘मुंबईतील आरोग्याची सद्य:स्थिती’ या  प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून अधोरेखित झाले आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत संरचना आणि मनुष्यबळ यांकडे पालिकेने गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष केल्यामुळेच करोनाच्या महासाथीमध्ये आरोग्य सेवेवर ताण पडत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या २७ टक्के जागा २०१५ मध्ये रिक्त होत्या. वर्षांनुगणिक हे प्रमाण वाढून २०१९ मध्ये ४७ टक्क्यांवर पोहोचले. पालिकेच्या रुग्णालयात सर्वाधिक मनुष्यबळाची कमतरता असून ६२ टक्के वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत, तर निमवैद्यकीय ४४ टक्के आणि परिचारिकांच्या १३ टक्के जागा भरलेल्या नाहीत. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे ५५० वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचारी असावेत, परंतु मुंबईत हे प्रमाण केवळ ७३ असल्याचे अहवालात मांडले आहे.

पालिकेने आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत संरचना विकासासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ५४ टक्के निधीचा वापर केलेला नाही. २०१६-१७ मध्ये हे प्रमाण ७३ टक्के होते. निधीची उपलब्धता असूनही भांडवली खर्चाच्या निधीचा वापर गेल्या काही वर्षांपासूनच केला जात नसल्याचे करोना काळात सेवा देण्यासाठी आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

देखरेख व्यवस्थेचा ढिसाळपणाही यातून उघड झाला आहे. विशेषत: मृत्यूचे कारणविषयक सांख्यिकी माहिती, आजारांचे सर्वेक्षण आणि देखरेख व्यवस्था सक्षम करण्यासाठी व्यवस्था (डेटा ट्रकिं ग) कार्यान्वित करणे गरजेचे आहे यावर संस्थेने लक्ष वेधले तरी अद्याप पालिकेने याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही, असे फाऊंडेशनचे विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.

पालिका आरोग्य विभाग

* वैद्यकीय           ३०

* निमवैद्यकीय       ३९

* परिचारिका         २६

* चतुर्थश्रेणी कामगार   ३१

* प्रशासकीय कर्मचारी   २८

पालिका रुग्णालयांतील रिक्त पदे (टक्क्यामध्ये)

वैद्यकीय                     ६२

प्राध्यापक                    ३३

निमवैद्यकीय              ४४

परिचारिका                   १३

चतुर्थश्रेणी कामगार       ३३

प्रशासकीय कर्मचारी      ३२

असंसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव

मुंबईत मधुमेह, कर्करोग, हृदयविकार आणि श्वसनाचे आजार या असंसर्ग आजारांचा प्रादुर्भाव अधिकतर असून दर पाचपैकी चार मृत्यू या आजारांमुळे होतात. २०१८ मध्ये मुंबईत दर दिवशी २८ लोकांचा मृत्यू कर्करोगाने, २९ लोकांचा मृत्यू मधुमेहाने आणि २२ जणांचा श्वसनाच्या आजाराने झाला आहे. असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण इतके मोठे असूनही या आजारांना उद्देशून सर्वंकष धोरण अद्याप अस्तित्वात नाही.

मृतांची संख्या वाढली

तुटपुंजे मनुष्यबळ आणि असक्षम पायाभूत सुविधांमुळे पालिकेची आरोग्य व्यवस्था करोनाकेंद्री झाल्याने या काळात गतवर्षीच्या तुलनेत बिगरकरोना रुग्णांच्या मृतांची संख्या वाढली आहे. मे २०२० मध्ये मुंबईमध्ये १३,८३३ मृत्यू झाले, तर मे २०१९ मध्ये ६,८३२ मृत्यू झाले होते. मे २०२० मध्ये कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९५७ आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ६,०४४ अधिक मृत्यू झाले, असे अहवालात मांडले आहे.