बाहेरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियोजनशून्यतेचा फटका

पारंपरिक शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक पातळीवर शिक्षणाची संधी देणाऱ्या ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थे’च्या (एनआयओएस) गेल्या काही महिन्यांतील भोंगळ व ढिसाळ कारभाराचा फटका मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील अनेक विद्यार्थ्यांना, पालकांना बसत आहे. परीक्षेबाबत संकेतस्थळावर कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, हेल्पलाइनवरूनही शंकांना उत्तरे दिली जात नाही तसेच काही प्रशासकीय केंद्रे पूर्वसूचनेविना बंद करण्यात आली असून त्यांची माहितीही पालकांना देण्यात आलेली नाही. अशा मोकाट कारभाराबद्दल पालकवर्गात तीव्र नाराजी आहे.

जगातील सर्वात मोठी मुक्त शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एनआयओएस’मार्फत दहावी, बारावी तसेच पदवी शिक्षणास पर्यायी अशा अभ्यासक्रमांतून शिकण्याची संधी दिली जाते. शैक्षणिक वर्षांत कधीही प्रवेश घेण्याची मुभा, पाठांतरकेंद्री असलेल्या नियमित विषयांना पर्यायी विषय, परीक्षा देण्याबाबत असलेली लवचीकता यामुळे दिव्यांग, गतिमंद, शिक्षणांत खंड पडलेले किंवा काम करत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल मुक्त शिक्षणाकडे असतो. मात्र संस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

संकेतस्थळ किंवा हेल्पलाइनसारखी अद्ययावत साधने असूनही ‘एनआयओएस’कडून माहिती मिळविताना पालकांना नाकीनऊ येत आहे. एनआयओएसची परीक्षा मार्चमध्ये आहे. परंतु, परीक्षा नोंदणीचा अर्ज, परीक्षेचे वेळापत्रक यांसारखी महत्त्वाची माहिती फेब्रुवारी उजाडला तरी संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. हेल्पलाइनवर संपर्क साधला तरी शंकांचे समाधान केले जात नाही. शिक्षणप्रवाहापासून दुरावलेल्यांकरिता दिलासा म्हणून सुरू करण्यात आलेल्या या स्वायत्त संस्थेचा

कारभार हा असा आहे. त्यामुळे समाजातील ज्या गटाला मदतीची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्या पदरी निराशा येत आहे, अशी खंत एका पालकाने व्यक्त केली.

‘एनआयओएस’ने पश्चिम उपनगरातील राजस्थान सेवा संघाचे कला आणि विज्ञान महाविद्यालय, डॉमिनिक सॅव्हिओ शाळा, बेगम जमिला हाजी अब्दुल हक्क गृहविज्ञान महाविद्यालय आणि सेंट जॉन युनिव्हर्सल शाळा या ठिकाणी प्रशासकीय केंद्रे सुरू केली होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी ही केंद्रेही बंद करण्यात आली. संस्थेच्या संकेतस्थळावर मात्र या केंद्रांची नावे कायम आहेत. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करताना पालकांनी या शाळा-महाविद्यालयांची अभ्यास आणि प्रशासकीय केंद्रे म्हणून निवड केली. परंतु, आता ही केंद्रे बंद झाल्याने पालकांची अडचण झाली आहे.

डिसेंबरमध्ये पालकांना ओशिवरा येथील के.एच.एम.डब्लू. महाविद्यालयात त्यांचे प्रशासकीय केंद्र हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांनी आता या केंद्रात धाव घेतली आहे. ‘एनआयओएस’ने केलेल्या बदलामुळे आमच्यावर अधिक २०० विद्यार्थ्यांची जबाबदारी पडली आहे. आम्ही आमच्यापरीने पालकांना अधिक त्रास होऊ  नये याकरिता प्रयत्न करत आहोत. अनेक पालकांना एनआयओएसच्या कार्यपद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले नव्हते. त्यामुळे आम्हाला त्यांचे समुपदेशन करावे लागले,’ असा खुलासा महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. प्रशासकीय केंद्र म्हणून आम्हाला पडणाऱ्या प्रश्नांबाबतही संस्थेकडून पुरेसा प्रतिसाद  मिळत नाही, अशी तक्रार येथील एका अधिकाऱ्याने केली. पालक आणि प्रशासकीय केंद्रांना येणाऱ्या अनुभवाबाबत एनआयओएसची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संस्थेच्या पुणे येथील प्रादेशिक केंद्रात विचारणा केली असता प्रस्तुत प्रतिनिधीलाही असाच अनुभव आला.