उद्या सकाळपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा मुंबईत आंदोलन करु असा इशारा आझाद मैदानात बेमुदत उषोणावर बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाजानं मुंबईत येऊन आंदोलन करावं असं आवाहन केलं आहे. आंदोलन झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असंही ते म्हणाले आहेत.

मराठा आंदोलक गेल्या चौदा दिवसांपासून आझाद मैदानात आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. मात्र सरकारने साधी दखलही घेतली नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे. ‘ज्या आमच्या मागण्या आहेत त्या उद्यापर्यंत मान्य करा. अन्यथा राज्यभरातून मराठी बांधव उद्या मुंबईत येणार’, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात विषय मांडण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून दिशाहीन करण्याचा प्रयत्न सुरु असून आंदोलन मुंबईबाहेर व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पुढे बोलताना मराठा आंदोलकांनी दिशाभूल होऊ नका, हिंसाचार करु नका असं आवाहन केलं असून हिंसाचार व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचाही आरोप केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे सादर करण्यात आला. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून यावर अभ्यास करुन पुढील पावलं उचलली जातील, अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा असं सूचक विधान केलं आहे. अहमनगरमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

मराठा आरक्षण लागू न झाल्यास 25 नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा असं म्हटलं आहे. ‘मराठा आरक्षणावर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. मी तुम्हा सर्वांना 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करण्याची विनंती करतो’, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.