सायबर गुन्हेगारीची प्रकरणे ही जगभर घडत असतात आणि त्यांचे स्वरूप हे अत्यंत गंभीर असते. आपल्या देशातही या घटना अगदी सर्वसामान्य ते मान्यवरांच्या बाबतीत घडत असतात. आपले बॉलीवूड आणि त्यातील स्टारमंडळीही त्याला अपवाद नाहीत. सायबर घोटाळा असो, सायबर फसवणूक असो की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याची चुकीची ओळख दाखवून केलेली फसवणूक, या गोष्टी सतत घडत असतात.

या सायबर गुन्हेगारीचे अलीकडचे प्रकरण घडले आहे ते प्रख्यात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेच्या बाबतीत. आदिनाथने याबाबतीत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने एक बोगस फेसबुक खाते आदिनाथच्या नावाने उघडून त्याचा खोटा इमेल आयडीसुद्धा निर्माण केला होता. त्या माध्यमातून या गुन्हेगाराने त्याचे मित्र आणि परिचितांशी संपर्क प्रस्थापित करत त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्याने आदिनाथ आणि त्याच्या कुटुंबाची छायाचित्रेही या खात्यावर पोस्ट केली असेही या तक्रारीत म्हटले आहे.

वाचा : लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणं पडलेलं महागात – नीना गुप्ता

सायबर सेलच्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून आदिनाथच्या तक्रारीनंतर तपासही सुरु केला आहे. कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून तो भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ आणि ५०० अंतर्गत (फ़सवणूक आणि बदनामी) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६- सी व ६६-डी (खोटी ओळख दाखवून संगणकाच्या माध्यमातून फसवणूक) अंतर्गत नोंदविला गेला आहे. त्यामुळे सध्याच्या घडील फेसबुक अकाऊंट वापरतेवेळी सतर्क राहण्याचीच गरज असल्याचं कळत आहे.