परळ, प्रभादेवी स्थानकाजवळ गटारातून ओंडके काढल्यानंतर पाण्याचा निचरा

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या कल्वर्ट (गटार)मध्ये रेल्वे मार्गालगत टाकलेले लाकडाचे ओंडके अडकल्यामुळे परळ आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरातील पाण्याचा निचरा होण्यात अडसर निर्माण झाला. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे या दोन्ही मार्गामध्ये असलेल्या कल्वर्टची पाहणी करून लाकडी ओंडके काढून टाकले आणि अखेर पाण्याचा निचरा होऊन रेल्वे मार्ग आणि आसपासचा परिसराला जलमुक्ती मिळाली. दरम्यान, या कल्वर्टच्या रुंदीकरणासाठी पालिकेने रेल्वे प्रशासनाला अनेक वेळा साकडे घातले. पालिकेने आता रेल्वे प्रशासनाला कल्वर्टच्या रुंदीकरणासाठी पैसेही दिले आहेत. परंतु रेल्वेला कल्वर्ट रुंदीकरणासाठी मुहूर्त न मिळाल्याने मंगळवारी तुंबलेल्या पाण्याचा परळ आणि एल्फिन्स्टनवासीयांना फटका बसला. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ठप्प झालेल्या वाहतुकीलाही हातभार लागला.

मध्य रेल्वेवरील परळ आणि पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी (एल्फिन्स्टन) रेल्वे स्थानकांदरम्यान पावसाचे पाणी जाण्यासाठी कल्वर्ट बांधण्यात आला आहे. या कल्वर्टमधून परळ आणि एल्फिन्स्टन परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. मुंबईत मंगळवारी संततधार पाऊस कोसळू लागताच परळ आणि एल्फिन्स्टन परिसरत प्रचंड पाणीकोंडी झाली. दुपारी ३ नंतर पावसाने जोर धरला आणि या परिसरातील साचलेल्या पाण्याची पातळी वाढू लागली. परिसरात बसविलेले पंप कार्यान्वित केल्यानंतरही पाण्याचा निचरा होत नसल्याने पालिका अधिकारी गोंधळात पडले. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत होण्यास हातभार लागला होता. पाण्याचा निचराच होत नसल्यामुळे अखेर बुधवारी पहाटे पालिका अधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गावर धाव घेतली आणि पाणी प्रवाह नेमका कोठे अडला आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकादरम्यानच्या कल्वर्टमधून पाण्याचा निचरा होत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अधिकारी आणि पालिकेचे कामगार कल्वर्टमध्ये उतरले आणि त्यांनी बारकाईने पाहणी केल्यानंतर लाकडाचे मोठे ओंडके त्यात अडकल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. पूर्वी रेल्वे मार्गाखाली लाकडाचे मोठे ओंडके घालण्यात येत होते. काही वर्षांनी लाकडाच्या ओंडक्यांऐवजी सिमेंटचे स्लिपर्स टाकण्यात आले आणि लाकडाचे ओडके रेल्वे मार्गालगतच टाकण्यात आले होते. गेली अनेक वर्षे ते तिकडेच पडून होते. हेच ओंडके कल्वर्टमध्ये गेल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडसर बनले होते.

स्लीपर्स बदलल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने या ओंडक्यांची विल्हेवाट न लावता ते तेथेच टाकून दिले असावेत. पावसाच्या पाण्याबरोबर ते कल्वर्टमध्ये गेले आणि अडकून बसले. मुळात हा कल्वर्ट बराच अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण करावे यासाठी पालिकेने अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने त्याकडे फारशा गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आता रेल्वे प्रशासनाने या कल्वर्टचे रुंदीकरण करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी पालिकेने रेल्वेला पैसेही दिले आहेत. हे काम पावसाळ्यापूर्वी झाले असते तर परळ आणि एल्फिन्स्टन दरम्यान पाणी साचून त्याचा नागरिकांना फटका बसला नसता, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.