पालिकेत १५ हजार सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या निधनानंतर सातत्याने सापत्न वागणूक मिळू लागल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्युनिसिपल मजदूर युनियनला ‘रामराम’ ठोकून शुक्रवारी ‘दि म्युनिसिपल युनियन’ची स्थापना केली. ‘दि म्युनिसिपल युनियन’च्या अध्यक्षपदी शरद राव यांचे पुत्र शशांक राव यांची, तर सरचिटणीसपदी रमाकांत बने यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबई महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून महिनाभरात १५ हजार सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प ‘दि म्युनिसिपपल युनियन’ने सोडला आहे. ‘दि म्युनिसिपल युनियन’मुळे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
india alliance manifesto marathi news
“इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात कामगारांविषयक मागण्यांचा समावेश करा”, संयुक्त कृती समितीची मागणी
SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय

ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस, शरद राव आदींची ‘म्युनिसिपल मजदूर युनियन’ ही मुंबई महापालिकेतील बलाढय़ कामगार संघटना म्हणून ओळखली जाते. एके काळी या युनियनची सदस्य संख्या ७० हजारांच्या घरात होती. आजघडीला ती ४३ हजार झाली आहे.

शरद राव यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली काही मंडळी युनियनच्या वतीने पालिकेच्या विविध खात्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष ठेवून होती. तसेच वेतन करार, बोनस करार आदींबाबत प्रशासनाशी वाटाघाटी करताना ही मंडळी कायम शरद राव यांच्यासोबत होती. म्युनिसिपल मजदूर युनियनमधील एका गटाला ही बाब खटकत होती. शरद राव यांच्या निधनानंतर या मंडळींनी हळूहळू युनियनवर ताबा मिळविला आणि शरद राव यांच्या समर्थकांची अडवणूक सुरू केली. यामुळे युनियनमध्ये दुफळी वाढत गेली.

अखेर शरद राव यांचे निकटवर्तीय या युनियनमधून बाहेर पडले. त्यात शशांक राव, रामकांत बने, रंगनाथ सातवसे आदींचा समावेश होता. शरद राव यांच्या निकटवर्तीयांनी ‘दि म्युनिसिपल युनियन’ स्थापन केली असून येत्या महिनाभरात १५ हजार सदस्य नोंदणी  करण्याचा संकल्प या नव्या युनियनने सोडला आहे.

शरद राव यांची ९ फेब्रुवारी २०१८ रोजी जयंती असून याच दिवशी ‘दि म्युनिसिपल युनियन’ची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेमध्ये युनियनमधील अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येणार आहे.

नव्या युनियनच्या स्थापनेमुळे मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या कामगार संघटनांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. आपले सदस्य संघटना सोडून जाऊ नयेत म्हणून या कामगार संघटनांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सदस्य नोंदणीबाबत सोडलेला संकल्प पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान ‘दि म्युनिसिपल युनियन’पुढे आहे.