सुभाषिते, सुविचार, काव्यपंक्ती गाडय़ांमध्ये पत्रक स्वरूपात मांडण्याचा प्रस्ताव

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाची उशिरा का होईना, ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’ला आठवण झाली आहे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषादिनानिमित्त मराठीतील सुभाषिते, सुविचार, श्रेष्ठ कवींच्या कवितांतील निवडक ओळी पत्रक स्वरूपात प्रत्येक बस गाडीत चिकटवण्यात येणार आहेत. यावेळी मराठी भाषेची सेवा करणाऱ्या प्राध्यापक किंवा शिक्षकांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात येणार असून यात प्रवाशांनाही सहभागी करून घेण्यात येईल, असे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’चे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार ही अंमलबजावणी केली जात आहे. मात्र या प्रस्तावावर काही अधिकारी रजेवर असल्याने त्यांच्या स्वाक्षरी झाल्या नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी पडून असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. एसटीच्या एकूण ६०७ बस स्थानकांवर ६ बाय ४ चे कापडी फलक प्रवाशांना दिसतील अशा ठिकाणी अडकवण्यात येणार असून अशा प्रकारे मराठी भाषादिन साजरा केला जाणार असल्याचे समजते.

ही गोष्ट स्वागतार्ह असल्याची भावना एसटीचे कर्मचारी व्यक्त करत आहेत.

यासाठी सर्व कार्यालयात सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

काय होणार?

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७  हजारांहून अधिक बस गाडय़ा आहेत. या सर्व बस गाडय़ांमध्ये मराठी भाषादिनी मराठी भाषेतील सुविचार, मराठी भाषेचे माहात्म्य सांगणाऱ्या कवितांच्या निवडक ओळींची पत्रके चिकटवण्यात येणार आहेत. यासाठी २ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  प्रस्ताव मान्य झाल्यास तातडीने याची अंमलबजावणी केली जाईल.