|| मानसी जोशी

मराठी मजकुरासाठी गुगल भाषांतराचा आधार :- मराठीच्या मुद्दय़ावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतच मराठी भाषेचे वाभाडे निघत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात किंवा कार्यालयात जाण्याचीही गरज नाही. पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतरही मराठी भाषेची ऐशीतैशी कशी केली जाते, याचे दर्शन आपल्याला घडू शकते. संकेतस्थळावरील इंग्रजी माहितीचे मराठीत भाषांतर करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची मदत घेण्याऐवजी ‘गुगल ट्रान्स्लेट’सारख्या ऑनलाइन भाषांतर साधनांची मदत घेतल्याने हे मराठी संकेतस्थळ हास्यास्पद ठरत आहे.

दररोज साधारणपणे चार हजारांहूनही अधिक व्यक्तींची भेट असलेल्या पालिकेच्या संकेतस्थळावर मुंबईविषयीच्या माहितीची वानवा तर आहेच, शिवाय जो काही मर्यादित मजकूर मराठीत उपलब्ध आहे त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. या मजकुराचे व्याकरण, आशय अशा सगळ्याच पातळीवर भाषेची ऐशीतैशी करून टाकली आहे. बहुतेक भाषांतर गूगलच्या माध्यमातून केल्याने अनेक ठिकाणी तर अर्थाचा अनर्थ झाल्याचे पाहायला मिळते.

बृहन्मुंबई महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर परवाने, महत्त्वाच्या कामांच्या निविदा आणि विविध कर याच्यासह शहरातील कलादालने, नाटय़गृहे, मनोरंजनाची ठिकाणे यांची माहिती      देण्यात आलेली आहे. आतापर्यंत या संकेतस्थळाला ५३ लाख जणांनी भेट दिल्याची नोंद आहे. संकेतस्थळावरील माहिती इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठीत स्वतंत्रपणे मजकुरनिर्मिती करण्याऐवजी इंग्रजीतून भाषांतर करण्याचा सोयीचा मार्ग पत्करण्यात आल्याने त्यात शुद्धलेखन व वाक्यरचनेच्या अनेक चुका दिसून येतात. या चुकांमुळे माहिती वाचताना त्रास होतो. इंग्रजी मजकुराच्या गूगल अनुवादात थोडेफार बदल करून तो मजकूर संकेतस्थळासाठी वापरण्यात आला आहे.

संकेतस्थळावर गेल्यास ‘पर्यटन’ विभागात मुंबई शहराची संस्कृती, मनोरंजन आणि पर्यटनाची प्रसिद्ध ठिकाणे, उद्याने, खाद्यपदार्थ आणि उद्योग यांची माहिती येते. संकेतस्थळावर ‘फुरसतीच्या वेळेत’ या विभागात रेसकोर्स येथील घोडय़ांच्या शर्यती माहिती दिली आहे. तेथे घोडय़ांऐवजी ‘घोद्यांच्या शर्यती’ असे दिसते. पुढे ‘बॉम्बे हाऊस’च्या ऐवजी ‘बॉम्बे हाऊज’, ‘नेत्रदीपक’च्या ऐवजी ‘नेत्रोद्यीपक’, ‘लागेल’च्या ऐवजी ‘लोगेल’, ‘फीरवावा’, ‘दपारी’, ‘नृत्याविषकार’ आणि ‘झ्वेरी बजार’ अशी मराठीची कत्तल करण्यात आली आहे.

माहितीची वानवा हा या संकेतस्थळाचा आणखी एक दोष. मुंबईतील लोकप्रिय उपाहारगृहांच्या माहितीचे पानच गायब आहे. संकेतस्थळावरील या त्रुटींविषयी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाला सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

अधिकाऱ्यांची गोड बोला..

‘मुंबईतील बॉलीवूड’ (सिनेमा) विभागातील शेवटच्या परिच्छेदात तर सदोष भाषांतराने कळस गाठला आहे. यात शहरातील प्रमुख चित्रीकरणाच्या स्थळांची माहिती आणि तेथील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पण पुढच्या ‘जनसंपर्क अधिकाऱ्यांशी गोड बोललात तर भेटीची परवानगी शक्य व्हावे तर अन्यथा स्थानिक लोक जे करतात तेच करावे लागेल,’ या वाक्यातून नेमके काय म्हणायचे आहे तेच कळत नाही. याच संकेतस्थळावर खाद्यपदार्थाच्या मजकुरात भेळपुरीची पाककृती देण्यात आली आहे. ती वाचताना तर हसू आल्याशिवाय राहत नाही.