मराठी तरुणाला घर नाकारणाऱ्या बिल्डरविरुद्ध अखेर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर धर्म, जात आदी कारणावरून भेद करून हक्क नाकारण्याच्या कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव येथे राहणारा वैभव रहाटे याला बहिणीसाठी सदनिका विकत घ्यायची होती. मालाड पश्चिम येथे श्रीनाथ बिल्डरचे ‘सॅलेस्टिअर हाइट’ या इमारतीचे बांधकाम सुरू होते. वैभवने त्या इमारतीत एक सदनिका पसंत केली. मात्र इमारतीचे बिल्डर राजेश मेहता यांनी तुम्ही मांसाहार करता का अशी विचारणा केली. त्यावर वैभवने होकार दिला. आम्ही मांसाहार करणाऱ्यांना सदनिका देत नाही, असे कारण बिल्डरने दिले. आपल्याला केवळ मराठी असल्यानेच सदनिका नाकारल्याचा आरोप करीत वैभवने राजकीय पक्षांकडे धाव घेतली. अखेर मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हा मुद्दा उचलून धरला. मराठी माणसाला मुंबईत फ्लॅट नाकारणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी निरुपम यांनी मालाड पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. अखेर बुधवारी मालाड पोलिसांनी राजेश मेहता आणि व्यवस्थापक वरुण मेहता यांच्यावर धर्म, जात यांच्या आधारावर भारतीय नागरिकाला हक्क नाकारल्याच्या भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १५३ ब (१) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी दिली. या दोघांनाही त्वरित अटक करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.