राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने शुक्रवारी संध्याकाळी आपला संप मागे घेतला. संपकरी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करून त्याबाबतचे शासकीय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी रात्री आठपासून डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून शिकाऊ डॉक्टरच्या झालेल्या मानसिक छळाचे निमित्त करत मार्डने आंदोलनाची हाक दिली होती. विविध मागण्या त्यांनी सरकारपुढे मांडल्या होत्या. त्यात वेतनवाढ, रजा मिळावी, कामाचे तास कमी करावे, सुरक्षेसाठी बाऊन्सर्स पुरवणे आदी मागण्यांचा समावेश होता. ‘मार्ड’संघटनेशी बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तीन तास चर्चा करून त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतरही त्यांनी गुरुवारी संप पुकारल्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा कोलमडली. सध्या निवासी डॉक्टरांना ४३ ते ४५ हजार रुपये विद्यावेतन असून, त्यात पाच हजार रुपयांची वाढ, नागपूर येथील प्राध्यापकांची बदली, पुरेशी सुरक्षा, क्षयरोग तसेच प्रसूती रजेसह सेंट्रल रेसिडेन्सी योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्यानंतरही मार्डने गुरुवारी रात्री उशिरापर्यत संप मागे घेतला नव्हता. अखेर शुक्रवारी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.