नागपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापकाच्या बदलीचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राखून ठेवल्याने ‘मार्ड’ संघटनेने शुक्रवारीही राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयातील ‘बाह्य़रुग्ण कक्षा’त काम न करण्याचे ठरविले आहे. गुरुनानक जयंतीची सुट्टी व त्याला जोडून ‘मार्ड’ने पुकारलेले आंदोलन यामुळे शासकीय रुग्णालयातील सेवा सलग तीन दिवस विस्कळीत होणार आहे. शुक्रवारी प्राध्यापकाच्या बदलीबात अंतिम निर्णय अपेक्षित असून त्यानंतर ‘मार्ड’ कडून हे आंदोलन मागे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. नागपूर वैद्यकीय महाविद्यालययातील डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या विरोधात निवासी डॉक्टरांकडून सातत्याने तक्रारी येऊनही राज्य शासनाकडून त्याबाबत कारवाई केली जात नव्हती. त्या विरोधात नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संपूर्ण काम बंद केले आहे. त्यांना पठिंबा देत गुरुवारपासून संपूर्ण राज्यातील निवासी डॉक्टरांनी बाह्य़रुग्ण कक्षातील सेवा बंद ठेवली आहे. दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी ‘मार्ड’ संघटनेची चर्चा झाली. या प्राध्यापकाची बदली निवासी डॉक्टर नसलेल्या सरकारी रुग्णालयात केली जाण्याची शक्यता आहे.