मुखपट्टीला हरताळ, फेरीवाल्यांची गर्दी, खरेदीला उधाण

मुंबई :  निर्बंधकाळात बाजारपेठा सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुल्या राहतील असे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. गल्लोगल्ली बसलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडे जमावाने होणारी खरेदी यामध्ये मुखपट्टी आणि अंतरनियमांचेही पालन होताना दिसत नाही. पोलिसांकडून कारवाई होऊन देखील फेरीवाल्यांना निर्बंधांची पर्वा राहिलेली नाही. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने कारवाईलाही सामोरे जाऊ, असा सूर फेरीवाल्यांचा आहे.

करोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूचा धोका लक्षात घेता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले. यामध्ये बाजारपेठा, दुकाने खुली ठेवण्यासाठी सायंकाळी ४ पर्यंतची मर्यादा घालण्यात आली. परंतु या निर्बंधांना बाजारपेठांमध्ये हरताळ फासला जात आहे. सायंकाळी ४ नंतर घरी परतणारा कर्मचारीवर्ग खरेदीसाठी येत असल्याने दुकानदार तासभराच्या दिरंगाईने दुकाने बंद करतात. साधारण सायंकाळी ६ च्या सुमारास सर्व दुकाने बंद होतात. पण त्याच वेळी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना उधाण येते. दुकाने बंद झाल्याने जास्तीचा ग्राहकवर्ग मिळतो, घरी जाणारे लोक आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे या प्रकाराला अधिकच खतपाणी मिळते आहे. मुंबईतील बहुतांशी भागात हीच परिस्थती आहे. दादर स्थानकाबाहेरची अवस्था अत्यंत बिकट आहे. कबूतरखाना, आसपासच्या गल्ल्या आणि स्थानक परिसरात शेकडो फेरीवाले रात्री उशिरापर्यंत दुकाने मांडून बसलेले असतात. अनेकांना मुखपट्टी, अंतर नियम याचा विसर पडलेला असतो. फेरीवाल्यांचे पेव धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, परळ, चेंबूर, घाटकोपर, अंधेरी आणि अन्य मध्यमवर्गीय वस्त्यांनजिक पाहायला मिळते.

कारवाई होते पण.. 

फुले, फळे, भाज्या, चपला, कपडे, भांडी इत्यादी वस्तू घेऊन बसलेल्या या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या आणि पालिकेच्या गाडय़ा येताच फेरीवाले आवाराआवर करून पळ काढतात. बऱ्याचदा कारवाई केल्यानंतरही पुन्हा फेरीवाले दुकान थाटतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘कारवाईदरम्यान कठोर भूमिका घेता येत नाही. तसे केले तरी त्याचे चुकीचे प्रदर्शन माध्यमातून केले जाते. शिवाय प्रत्येकाचीच परिस्थिती हलाखीची असल्याने दंड आकारतानाही फेरीवाले गायावया करतात, हात जोडतात. त्यामुळे परिस्थिती संयमाने हाताळावी लागते,’ असे दादर येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

जगण्यासाठी कारवाईचाही सामना करू.

जगण्यासाठी कारवाईचाही सामना करू असे ठिकठिकाणच्या फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. ‘चार दिवसांपूर्वी मी १५० रुपयांचे कपडे विकले होते, ज्यातून मला ५० रुपये सुटले. त्यानंतर अद्याप ग्राहकच मिळाले नाहीत. कारवाईच्या भीतीने घाबरून घरात बसलो तर रोजच्या जेवणाचेही वांधे होतील,’ असे रमेश पासवान या कपडे विक्रेत्याने सांगितले. तर दादर बाजारात बाकडा थाटून चपला विकणारे संजय कदम म्हणाले, ‘घराचे भाडे, आईचे आजारपण, मुलांचे शिक्षण गेली कित्येक वर्षे याच व्यवसायावर सुरू आहे. गेल्या वर्षीपासून निर्बंधांमुळे रस्त्यावर दुकान लावायला अडचणी येत आहेत. पण कमावलेच नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ.’