|| शैलजा तिवले

गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहोचण्यास अडचणी

मुंबई : मुंबईत २०१६मध्ये प्रसूतीदरम्यानचा माता मृत्युदर २००च्या वर गेल्याने महापालिकेने विविध योजना आखून तो प्रयत्नपूर्वक कमी करण्यात यश मिळवले होते. मात्र यंदा पुन्हा माता मृत्यूच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी माता मृत्यूचा दर १७२ होता, तो यंदा १८३ झाला आहे. टाळेबंदीत अनेक गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहोचण्यात अडचणी आल्यामुळे माता मृत्युदरात वाढ झाली आहे.

टाळेबंदीत बहुतांश कुटुंबे स्थलांतरित झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रसूतींची संख्या कमी आहे. परिणामी या काळात शहरातील माता मृत्यूची आकडेवारी ४० टक्क्यांनी कमी झालेली दिसते. मात्र जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत माता मृत्युदर मात्र वाढला आहे.

शहरात जानेवारी ते सप्टेंबर काळात १६२ मातांचा मृत्यू झाला. हा मृत्युदर १८३ आहे. गेल्या वर्षी २४१ मातांच्या मृत्यूची नोंद आहे, तर मृत्युदर १७२ होता. माता मृत्युदर दर एक लाख जिवंत बालकांमागे होणाऱ्या मातांचा मृत्यू याप्रमाणे मोजला जातो. यंदा माता मृत्यू तुलनेत कमी असले तरी मृत्युदरात वाढ आहे. २०१६ मध्ये २००वर असलेला माता मृत्यु दर गेल्या काही वर्षात १४४वर आणण्यात पालिके ला यश आले होते. परंतु २०१९ मध्ये यात पुन्हा वाढ झाली. आता करोनाकाळात यात आणखी वाढ झाली आहे.

‘गरोदर महिलांची विविध स्तरावर केली जाणारी देखरेख यांमुळे माता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात करोनाकाळात मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार स्थलांतरित झाले. त्यामुळे होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण कमी झाले. परिणामी मातामृत्यूचे प्रमाण कमी झाले. मात्र माता मृत्युदर वाढलेला दिसतो,’ असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे मुंबईबाहेरील प्रसूतीचे प्रमाण कमी

मुंबईपेक्षा आसपासच्या परिसातून येणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. टाळेबंदीच्या काळात मुंबईबाहेरील मातांना येणे शक्य नसल्याने यांची संख्या कमी झाली. शीव रुग्णालयात दर दिवशी ३० ते ४० प्रसूती याप्रमाणे जवळपास दहा हजार प्रसूती होतात. परंतु टाळेबंदीत हे प्रमाण प्रतिदिन २० ते २५ वर होते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राहुल मयेकर यांनी सांगितले.

मुंबईबाहेरील मातांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

जानेवारी ते सप्टेंबर या काळात मुंबईत ७५ तर मुंबईजवळील परिसरात ८७ मातांच्या मृत्यूची नोंदले गेले. सर्वाधिक म्हणजे २७ मृत्यू नोंदलेल्या मे महिन्यात २२ मृत्यू हे मुंबईजवळील परिसरातील मातांचे होते. जुलैमध्येही एकूण २२ मृत्यूपैकी १५ मुंबईबाहेरील मातांचे झाले होते.

टाळेबंदीत सर्वाधिक मृत्यू

माता मृत्यूंची सर्वाधिक नोंद (२८) मे महिन्यात झाली. जुलै (२२) आणि सप्टेंबरमध्ये (२३) अधिक माता मृत्यू नोंदले गेले. मे, जुलै आणि सप्टेंबरमध्ये करोना संसर्गाच्या तीव्रतेचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यू वाढल्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

बालकांच्या संख्येत घट

जानेवारीत शहरात १२,९७६ बालकांचा जन्म झाला. मार्च आणि एप्रिलमध्ये हे प्रमाण सात हजारांपर्यंत कमी झाले. जून-जुलैमध्ये अनुक्रमे १०,८६६ आणि ११,८३० झाले. जानेवारी ते सप्टेंबरमध्ये ८८,७०९ जिवंत बालकांची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये हे प्रमाण १,४०,११६ होते.