दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गेल्या अनेक वर्षांपासून माथाडी कामगारांना मुंबईत घरे देण्याचा प्रश्न प्रलंबित होता, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा नव्याने चालना दिली आहे. माथाडी कामगारांच्या घरांबाबत येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांच्या नेत्यांना दिले.

कामगार विभागाच्या अखत्यारितील माथाडी मंडळांमध्ये नोंदित असलेल्या माथाडी कामगारांना मुंबईत घरे द्यावीत, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या आधीच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही हा प्रश्न सातत्याने मांडला जात होता. त्यावर मुंबईत माथाडी कामगारांच्या घरांसाठी जागा देण्याचेही तत्वत मान्य करण्यात आले होते. परंतु पुढे त्याबाबत काहीच ठोस कार्यवाही झाली नाही.

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी या प्रश्नावर सह्य़ाद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. बैठकीला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, माजी आमदार विजय सावंत, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख आदी कामगार नेते उपस्थित होते.  या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

कुठे मिळणार?

माथाडी कामगारांच्या घरांसाठी चेंबूर येथे एक लाख २४ हजार चौरस मीटर आणि वडाळा येथे ६५ हजार चौरस मीटर जागा देण्यात येणार असल्याचे समजते. या योजनेसाठी वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकही देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या घरकूल योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर येत्या दोन महिन्यांत माथाडी कामगारांच्या घरांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी कामगार नेत्यांना दिले.