माथेरानला जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर आहे. आठ महिन्यांपूर्वी रुळावरून डबे घसरून झालेल्या अपघातामुळे बंद करण्यात आलेली माथेरानची मिनी ट्रेन लवकरच सेवेत येईल, असे संकेत मिळाले आहेत. सध्या नेरळ आणि माथेरानदरम्यान रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मिनी ट्रेनची सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अमन लॉज स्थानकाजवळ आठ महिन्यांपूर्वी मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरले होते. त्यामुळे सुरक्षेसाठी मिनी ट्रेनची सेवा बंद केली होती. सध्या या मार्गावर रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याची पाहणी नुकतीच मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी केली आहे. माथेरानची मिनी ट्रेन सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या माथेरान येथे चालवली जाणारी ‘मिनी ट्रेन’ वर्ष भरात दोन वेळा रुळावरून घसरल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ही ट्रेन बंद ठेवण्यात आली आहे. मात्र ही ट्रेन केव्हा सुरू होईल याची अनिश्चितता होती. माथेरानची राणी धावेल की नाही याबाबत अनेकांना शंका आहे. ट्रेन सुरू करण्यापूर्वी सर्व सुरक्षा उपाय योजना, डब्यांमधील रचना, संरक्षक भिंत बांधण्याचे नियोजन आहे. यातील संरक्षक भिंतीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून ट्रेन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ती कधी सुरू होईल हे सांगता येणे कठीण आहे असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिलेश अग्रवाल यांनी सांगितले होते.

या वर्षी मिनी ट्रेन रुळावरून घसरण्याच्या सलग दोन घटना एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला घडल्या होत्या. त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एका स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली होती.