News Flash

मटक्याचे आकडे प्रसिद्ध करण्यास वृत्तपत्रांना मनाई

न्यायालयाकडून सहा दैनिकांची कानउघाडणी

न्यायालयाकडून सहा दैनिकांची कानउघाडणी

वृत्तपत्रांमधून मटक्याचे आकडे प्रसिद्ध केले जात असताना ते ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राचे आकडे असल्याच्या वृत्तपत्र प्रकाशन संस्थांच्या दाव्याचा समाचार घेत उच्च न्यायालयाने वृत्तपत्रांच्या जनजागृतीच्या हेतूवरच शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वृत्तपत्र ही लोकांच्या जागृतीसाठी काम करतात असे म्हटले जाते मग हा काय प्रकार आहे, याची गरजच काय आहे, कुणाच्या सांगण्यावरून ही माहिती प्रसिद्ध केली जाते, त्यात वृत्तपत्रांचा फायदा काय, अशी प्रश्नांची सरबत्ती करत न्यायालयाने सोलापूर येथील सहा वृत्तपत्रांमध्ये मटक्याचे आकडे प्रसिद्ध करण्यासही मनाई केली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्याबाबत सोलापूर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले. मटक्याचे आकडे वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जात असल्याचे उघड असताना संबंधित वृत्तपत्रांच्या मालक आणि संपादकांनी दिलेल्या जबाबावरून जुगार प्रतिबंधक कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्याची गरज नाही, असा अहवाल पोलीस दाखलच कसा करू शकतात, असे सुनावत न्यायालयाने पोलिसांची भूमिका धक्कादायक असल्याचे फटकारले.

‘ऑल इंडिया ‘मन राइट्स असोसिएशन’चे श्रीगुरुराज पोरे यांनी याबाबत जनहित याचिका केली असून मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी याचिकाकर्त्यांने सोलापूरमधील ज्या सहा वृत्तपत्रांमध्ये हे आकडे प्रसिद्ध केले जातात. त्याच्या प्रती न्यायालयासमोर सादर केल्या. त्यात मुंबई-कल्याण मटक्याच्या आकडय़ांचा तक्त्याचाही प्रामुख्याने समावेश होता.

या तक्त्यामध्ये आधीच्या दिवसाचा निकाल आणि दुसऱ्या दिवशीचे आकडे प्रसिद्ध केले जातात. त्यावर अमूक एक आकडा हा अचूक ठरवण्याचा निर्णय वाचकांवर सोडला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून हे आकडे प्रसिद्ध केले जात असून तक्रार करूनही प्रशासनातर्फे संबंधित वृत्तपत्रांवर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही याचिकाकर्त्यांने न्यायालयात केला. याचिकाकर्त्यांनी २०१२ मध्ये सोलापूर पोलिसांत तक्रार नोंदवत संबंधित वृत्तपत्राचे मालक, संपादक यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची मागणी केली होती. या वृत्तपत्रांचे मालक आणि संपादकांनी यावर उत्तर दाखल करताना हे क्रमांक ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या आधारे प्रसिद्ध केल्याचा दावा केला.

मटका व्यावसायिकांच्या तडीपार करण्याचे आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील मटकाबुकी व त्यांचे एजंट यांची स्वतंत्र गँग हिस्ट्रीसिटी तयार करून अशा अवैध मटका व्यावसायिकांना एक वर्षांसाठी तडीपार करण्याचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी दिले. जिल्ह्यात अवैध व्यवसाय व व्यावसायिकांना थारा देऊ नका, अशा सक्त सूचना नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  या वेळी मटकाबुकी मालक, एजंट अशा ८७ सराईत गुन्हेगारांचे आदान प्रदान करण्यात आले. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती इतर पोलीस ठाण्यांशी आदान-प्रदान करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची साखळी मोडून काढा, असा आदेश नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:34 am

Web Title: matka gambling mumbai high court
Next Stories
1 एल अँड टी, शापुरजी पालनजी यांच्या बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी निविदा
2 पालिकेवर कारवाई केल्यास मुंबईचे आरोग्य बिघडणार
3 मानवी इंगळे या मुलीच्या मृत्यूचे गूढ उकलले
Just Now!
X