20 September 2020

News Flash

महापौर बंगला उपनगरात?

महापौर बंगल्यामध्ये कायम वर्दळ असते. राणीच्या बागेत प्राणिसंग्रहालय आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात होणार असून याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे.

निवासस्थानाकरिता शहरात मोकळ्या भूखंडाचा अभाव

महापौरांना वास्तव्यासाठी देऊ केलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यास शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने महापौर बंगल्यासाठी मुंबईतील मोकळ्या भूखंडांची यादी महापौरांच्या हाती सुपूर्द केली आहे. महापौर सांगतील त्या भूखंडावर आलिशान बंगला उभारून देण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखविली आहे. मात्र शहरात एकही मोकळा भूखंड नसल्यामुळे महापौर बंगल्यासाठी उपनगराचा आसरा घ्यावा लागणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राणीच्या बागेतील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यामध्ये महापौरांच्या निवासाची व्यवस्था करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. मात्र उद्यान अधीक्षकांचा बंगला मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना साजेसा नाही. महापौर बंगल्यामध्ये कायम वर्दळ असते. राणीच्या बागेत प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे वर्दळीचा प्राण्यांना त्रास होऊ शकतो, असे कारण पुढे करीत शिवसेनेकडून या बंगल्याला विरोध करण्यात आला आहे.

राणीच्या बागेऐवजी पालिका आयुक्तांचे वास्तव्य असलेला अल्टा माऊंट रोड येथील बंगला आणि मलबार हिल येथील अतिरिक्त आयुक्तांचे वास्तव्य असलेला जलविभागाचा बंगला महापौरांना द्यावा, असा आग्रह शिवसेनेकडून धरण्यात आला आहे. मात्र महापौर निवासात होणारी गर्दी लक्षात घेता मलबार हिल येथील जलाशयाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत प्रशासनाने हा बंगला महापौरांना देण्यास नकार दिला आहे. तसेच पालिका आयुक्तांचा बंगलाही महापौरांना देण्यास प्रशासन राजी नाही.

प्रशासनाने सुचविलेला बंगला घेण्यास महापौर राजी नाहीत, तर शिवसेनेने सुचविलेला बंगला देण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे महापौर निवासस्थानाबाबत पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठी प्रशासनाने शक्कल लढविली आहे. मुंबईमधील मोक्याच्या ठिकाणच्या मोकळ्या भूखंडांची यादी महापौरांना सादर करण्यात आली आहे. यापैकी एखाद्या भूखंडाची महापौरांनी निवड करावी, असे महापौरांना कळविण्यात आले आहे. महापौरांनी सुचविलेल्या भूखंडावर नवा आलिशान बंगला बांधून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे.

मुंबईच्या शहर भागात मोकळे भूखंड शिल्लकच नाहीत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पालिकेचे अनेक भूखंड मोकळे आहेत. महापौरांना सादर केलेल्या यादीत या भूखंडांचा समावेश त्यापैकी मोक्याच्या ठिकाणचा एखादा भूखंड महापौरांनी निवडल्यास तेथे त्यांच्यासाठी बंगला बांधून देता येईल, असे पालिकेतील वरिष्ठ  अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. महापौरांनी नकार दिला असला तरी राणीच्या बागेतील बंगल्याची डागडुजी करण्यात येत आहे. भविष्यात हा बंगला अन्य व्यक्तीच्या वास्तव्यासाठी होऊ शकेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासनाच्या या नव्या प्रस्तावानुसार मुंबईच्या मध्यवर्ती असलेले सध्याचे महापौरांचे वास्तव्य भविष्यात पूर्व अथवा पश्चिम उपनगराच्या आश्रयाला जाण्याची चिन्हे नाकारता येत नाही.

वास्तव्यासाठी देऊ केलेल्या राणीच्या बागेतील बंगल्याला आपण विरोध दर्शविला आहे. मात्र मोकळ्या भूखंडांच्या यादीबाबत आपल्याला कोणतीच कल्पना नाही.

– विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 3:40 am

Web Title: mayor bungalow likely to shift in mumbai suburbs
Next Stories
1 मेट्रो फलाटांवर काचेची भिंत
2 देवनारमध्ये दीड लाख बकऱ्यांची आवक
3 शहरबात ; रेरा आला.. पुढे काय?
Just Now!
X