माझगाव डॉक लिमिटेडने फेब्रुवारी २०१४मध्ये जाहिरात देऊन सुरू केलेली भरती प्रक्रिया नुकतीच ९ मार्च रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करून रद्द केली आहे. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच पदांसाठी जाहिरात देण्यात आल्यामुळे आधी घेण्यात आलेली परीक्षा रद्द का करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉकच्या या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या १५४ उमेदवारांवर अन्याय झाला आहे.
माझगाव डॉक लिमिटेडने २५ फेब्रुवारी २०१४ रोजी मुख्य व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आणि वित्त विभागात कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदांसाठीच्या एकूण १६ जागांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार हजारो उमेदवारांनी अर्जही केले. वित्त विभागात कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या सहा जागांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या १५४ उमेदवारांची १० ते १२ डिसेंबर या कालावधीत मुलाखतीही घेण्यात आल्या. आज निकाल येईल उद्या निकाल येईल या प्रतीक्षेत असलेल्या या उमेदवारांना माझगाव डॉक लिमिटेडच्या संकेतस्थळावर ९ मार्च रोजी या परीक्षेसंदर्भातील लिंक दिसली. ही लिंक उघडून पाहिल्यावर २५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील वित्त विभागात कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक दिसले. हे परिपत्रक पाहिल्यावर मुलाखती दिलेल्या उमेदवारांच्या पायाखालची जमीनच सरकली. या उमेदवारांनी एक वर्षभर या प्रक्रियेत राहून नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण या परिपत्रकामुळे त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. या परिपत्रकाला एक दिवस होत नाही तोवर १० मार्च रोजी माझगाव डॉक लि. ने वित्त विभागात कार्यकारी प्रशिक्षणार्थी याच पदासाठीच्या ११ जागांसाठी जाहिरात देऊन मुलाखत दिलेल्या उमेदवारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेही काम केले. जर ही पदे भरावयाची होतीच तर आधीची परीक्षा रद्द का केली, असा प्रश्न उमेदवार विचारत आहे.
 जर या उमेदवारांनी आता पुन्हा ही परीक्षा द्यावयाची ठरली तर यातील अनेकांचे वय अटीमध्ये बसत नसल्याने त्यांना पुढे जाता येणार नसल्याने त्यांचे नुकसान झाल्याची भावनाही उमेदवार व्यक्त करत आहे. दरम्यान, प्रशासकीय कारणांमुळेच ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे माझगाव डॉक लि.च्या मनुष्यबळ विकास विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.