‘मेक इन इंडिया’चा परिणाम असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज
एमबीए, एमएमएस आदी व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांकरिता होणाऱ्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’करिता (सीईटी) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात ३९ हजारांच्या आसपास असलेल्या एमबीए, एमएमएस, पीजीबीएम या अभ्यासक्रमांच्या जागांकरिता ६० हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. यंदा तब्बल ७४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ही सीईटी द्यायची आहे. ‘मेक इन इंडिया’मुळे महाराष्ट्रात होणाऱ्या कोटय़वधींच्या गुंतवणुकीच्या पाश्र्वभूमीवर भविष्यात व्यवस्थापकांची मागणी असेल. परिणामी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढली असावी, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.
१२ आणि १३ मार्चला तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ही सीईटी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. एकीकडे अनेक संस्था व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या जागा कमी करण्याकरिता ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’कडे (एआयसीटीई) अर्ज करीत आहेत. अर्थात मागणीच्या तुलनेत अनेक संस्थांनी भरमसाट संख्येने जागा वाढवून घेतल्या होत्या. त्यामुळे ज्या अभ्यासक्रमांना मागणी नाही अशा जागा कमी करण्याकरिता संस्थांनी अर्ज केले आहेत, तर दुसरीकडे सीईटी देऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यापैकी किमान ५० ते ६० हजार विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यंदा व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाणही कमी असेल, असा अंदाज तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी व्यक्त केला.
तीन वर्षांपूर्वी राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या तब्बल ४५ हजार जागा होत्या. अनेक संस्थांनी मागणी नसल्याने आपल्या जागा कमी केल्याने दोन वर्षांपूर्वी त्या कमी होऊन ४२ हजारांवर आल्या. गेल्या वर्षी त्या ३९ हजारांवर आल्या. त्यापैकी सुमारे ३० हजार जागांवर प्रत्यक्षात प्रवेश झाल्याने सुमारे नऊ हजारांच्या आसपास जागा गेल्या वर्षी रिक्त राहिल्या होत्या. मात्र यंदा जागा कमी झाल्या असल्या तरी विद्यार्थी संख्या वाढल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरसही असेल. त्यामुळे जागाही कमी रिक्त राहतील, असा अंदाज आहे.

गुंतवणुकीचा परिणाम?
नुकत्याच झालेल्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात भविष्यात तब्बल ८.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे व्यवस्थापकांना असलेली मागणीही वाढण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर व्यवस्थापन अभ्यासक्रमाला असलेली मागणी वाढली असावी, असा अंदाज सु. का. महाजन यांनी व्यक्त केला.