किनारपट्टीवरील सात बंदरांवर शार्क माशांची पिल्ले पकडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे उघडकीस आले आहे. कांदळवन कक्षाअंतर्गत, कांदळवन प्रतिष्ठानने (मॅनग्रोव्ह फाऊंडेशन) केलेल्या सात महिन्यांच्या प्राथमिक अभ्यासातून  शार्कची मासेमारी नियंत्रित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

कांदळवन प्रतिष्ठानतर्फे सातपाटी, ससून डॉक, माझगाव, वर्सोवा, अलिबाग, हर्णे आणि मालवण या सात ठिकाणी एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान हा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास कांदळवन प्रतिष्ठानच्या सागरी जीवशास्त्रज्ञ धनश्री बगाडे यांनी केला. अभ्यासादरम्यान हर्णे, ससून डॉक, माझगाव, मालवण बंदरांवर ब्लॅक टीप शार्क आणि हॅमरहेड शार्कची पिल्ले आढळली. एकूण ३१ प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी १८ प्रजातींची शार्कची पिल्ले अनेक बंदरांवर आढळली. शार्क माशांची सुमारे ५० टक्केच पिल्ले प्रौढ होतात, उर्वरित ५० टक्के पिल्लांची मासेमारी होते, असा अभ्यासाचा निष्कर्ष आहे. त्यांची मासेमारी अशीच सुरू राहिली तर या प्रजातींची पैदास मंदावण्याची भीती आहे.

शार्क माशांबाबत आपल्याकडे अनेक स्तरांवर छोटेमोठे अभ्यास झाले आहेत. मात्र त्याचबरोबर शार्कच्या पिल्लांच्या अभ्यासाला अधिक चालना मिळण्याची गरज आहे.

बहुतांश शार्क प्रजातींचा ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ संस्थेच्या (आययूसीएन-ही संस्था संयुक्त राष्ट्रांतर्गत कार्य करते.) वर्गवारीनुसार संवर्धनाबाबत धोकादायक पातळीवरील गटांत समावेश होतो. या यादीनुसार शार्कच्या संवर्धनासाठी सर्वाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र सध्यातरी याबाबत आपल्याकडे निरुत्साहच आहे.

मुख्यत: मोठय़ा यांत्रिक बोटींद्वारे होणाऱ्या अनियंत्रित मासेमारीमुळे शार्कला धोका निर्माण होत असल्याची माहिती मच्छीमार संघटनांनी दिली. मोठय़ा जाळ्यांद्वारे शार्क मासे पकडले जातात. त्यांत त्यांची पिल्लेदेखील मोठय़ा प्रमाणावर अडकतात, असे मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

लवकरच निर्बंध! केंद्रीय मत्स्यपालन मंत्रालयाने मासेमारीसाठी ‘किमान कायदेशीर आकार’ (मिनिमम लिगल साइज) निर्बंध लागू केले आहेत. राज्य पातळीवर सध्या हे नियम तयार झाले असून, लवकरच त्यासंदर्भात शासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे मत्स्य व्यवसाय सहआयुक्त राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

मत्स्यपरांचाही व्यापार?

* कांदळवन प्रतिष्ठानने केलेल्या पाहणीदरम्यान मालवण आणि सातपाटी बंदरावर काही प्रमाणात मत्स्यपरदेखील (शार्क फिन) आढळल्याची नोंद आहे.

* मत्स्यपरांचा व्यापार, प्रवास याबाबत मात्र अधिक माहिती मिळाली नाही. ‘आययूसीएन’च्या यादीनुसार संरक्षण लाभलेल्या काही प्रजातींच्या मत्स्यपरांचा यात समावेश आहे.

* अशा मत्स्यपरांचा साठा, विक्री, आयात-निर्यातीवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तरीही असे प्रकार अधूनमधून घडतात.