राज्यातील सरकारी व काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशाकरिता होणारी ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (एमएच-सीईटी) ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या बारावी इयत्तेच्या विज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमाच्या आधारे होणार आहे. या परीक्षेकरिता ‘एनसीईआरटीई’ने नेमून दिलेला अकरावी-बारावीचा (विज्ञान) अभ्यासक्रम प्रमाण मानला जात होता. मात्र आता केवळ बारावीचा अभ्यास करावा लागणार असल्याने या परीक्षेच्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांवरील ताण कमी झाला आहे.
‘एमएच-सीईटी’ ही विविध आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरिता घेण्यात येते. गेल्या वर्षीपासून तिचे स्वरूप केंद्रीय पातळीवर झालेल्या २०१३ साली झालेल्या ‘नीट’प्रमाणे बदलण्यात आले. तिचा अभ्यासक्रमही ‘नीट’साठी नेमून दिलेल्या ‘एनसीईआरटी’च्या अकरावी-बारावी विज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारलेला होता. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांकरिता ७ मे रोजी होणारी ‘एमएच-सीईटी’ देखील या स्वरूपात होणार होती. परंतु, राज्य शिक्षण मंडळाच्या आणि ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमामधील तफावत पाहता ‘एमएच-सीईटी’ राज्याच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक, विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या मागणीला प्रतिसाद देत ‘एमएच-सीईटी’ राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार घेण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, या संबंधातील सूचना परीक्षेचे आयोजक असलेल्या ‘वैद्यकीय संचालनालया’च्या (डीएमईआर) संकेतस्थळावर देण्यात आलेली नव्हती. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. सुमारे २ लाख विद्यार्थी या परीक्षेला दरवर्षी बसतात. या आठवडय़ात बारावीची परीक्षा संपते आहे.
त्यामुळे हा संभ्रम लवकर दूर होणे आवश्यक होते. परंतु, आता थेट अकरावी-बारावीऐवजी केवळ बारावीच्या अभ्यासक्रमावर सीईटी होणार असल्याचा निर्णय घेऊन सरकारने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा भार फारच हलका केला आहे.
दरम्यान, ‘नेगेटीव्ह’ मूल्यांकन रद्द करण्यात आल्याने अभ्यासक्रमाच्या बदलाबरोबरच एमएच-सीईटी परीक्षेचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. आता या परीक्षेचे स्वरूप २०१२ पर्यंत होत असलेल्या ‘एमएच-सीईटी’नुसार असणार आहे. त्यानुसार ती पूर्वीप्रमाणेच २०० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण अशी विभागणी असणार आहे.
परदेशस्थ विद्यार्थ्यांना दिलासा
भारतीय मूळ असलेल्या तसेच परदेशी नागरिकत्व असलेल्या परदेशस्थ भारतीय विद्यार्थ्यांनाही (पीआयओ आणि ओसीआय) ‘एमएच-सीईटी’ परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना २०१५च्या परीक्षेपासूनच ही परवानगी देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. या विद्यार्थ्यांना आतापर्यंत या परीक्षेला बसता येत नव्हते.