रेल्वे अपघातात जखमी होणाऱ्या प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आणखी नऊ रेल्वे स्थानकांमध्ये खासगी संस्थांच्या मदतीने वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्यात येणार आहेत. ठाणे, पनवेल स्थानकांत असे पीपीपी तत्त्वावर कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. आता कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, दिवा, डोंबिवली, कल्याण, कर्जत, वडाळा आणि वाशी या स्थानकांमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली.
अपघातानंतर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचण्यास अनेकदा विलंब होतो. परिणामी जखमी प्रवासी वाटेतच दगावतो. यासंबंधात उच्च न्यायालयात झालेल्या विविध याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने जखमी प्रवाशांकरिता तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश रेल्वेला दिले होते.