|| संदीप आचार्य

औषधे उपलब्ध होण्यात अडथळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. शिवसेनेच्या आमदारांच्या माध्यमातूनही आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवा करीत आहोत. आरोग्य संचालकांना अनेक पत्रे लिहिली, मात्र गेल्या वर्षभरापासून हिमोफिलियाच्या रुग्णांना अत्यावश्यक असलेली औषधे उपलब्ध होण्यात अडथळ्यांची शर्यत सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘हिमोफिलिया सोसायटी ऑफ इंडिया’चे सचिव अजय पालंडे यांनी व्यक्त केली. मी स्वत:ही हिमोफिलियाचा रुग्ण असून अलीकडेच औरंगाबाद येथे औषधे उपलब्ध नसल्यामुळे मुंबईला येणारा एक मुलगा वाटेतच मरण पावला. मात्र आरोग्य विभाग सुस्तच आहे, अशी खंत पालंडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून हिमोफेलियाच्या रुग्णांना मोफत औषधे देण्यात येतात. त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील रुग्ण मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रात येऊ लागल्यामुळे आरोग्य विभागाच्या विविध केंद्रांमधील हिमोफेलियाच्या औषधाचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. तर हिमोफिलिया सोसायटीच्या महाराष्ट्रातील शाखांच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, औरंगाबाद, नाशिकपासून राज्यातील बहुतेक केंद्रांमध्ये फॅक्टर आठ व फिबा इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. सातारा येथे हिमोफिलियाची औषधे संपली असून मुंबई वगळता अन्यत्र या औषधांचा अभाव आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ज्या हाफकिन संस्थेकडून या औषधांची खरेदी होणे अपेक्षित आहे त्यांनी या औषधांची निविदा प्रक्रिया रद्द केल्यामुळे सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक बोलाविण्यात आली आहे. या औषध तुटवडय़ाचा फटका राज्यातील सुमारे ४२५७ रुग्णांना बसत असल्याचे हिमोफेलिया सोसायटीचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात सुमारे दोन वर्षांपूर्वी हिमोफेलियावरील औषधे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नाशिक, अमरावती, ठाणे, सातारा या ठिकाणी, तर नंतर नांदेड, नागपूर व जळगाव येथे आरोग्य विभागाने या रुग्णांना मोफत औषधे देण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली. या योजनेचा मुंबई, पुणे आदी ठिकाणच्या रुग्णांनाही लाभ मिळावा व यासाठी मुंबई व पुणे येथे केंद्र सुरू करावे अशी याचिका हिमोफेलिया क्षेत्रातील सेवाभावी संघटनेने उच्च न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार केईएम, जे.जे. रुग्णालय तसेच पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. या हिमोफेलियाच्या रुग्णांमध्ये शरीरातील रक्तस्राव गोठण्याची प्रक्रिया होत नाही. परिणामी एखाद्या रुग्णाला जखम झाल्यास रक्तस्राव होतच राहतो. रक्तातील ‘थ्रोम्बोप्लास्टिन’ घटकामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया होत असते. हिमोफेलिया रुग्णाच्या रक्तात फॅक्टर आठ व नऊ या घटकांची कमतरता असल्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही. आजघडीला महाराष्ट्रात या आजाराचे एकूण ४२५७ रुग्ण असून सामान्यपणे एका रुग्णापाठी ३० ते ५० हजार रुपये औषधांचा खर्च येत असतो. औषधे नसल्यामुळे रुग्णांना स्वत: हा खर्च करावा लागत असल्याचे हिमोफेलिया सोसायटीचे म्हणणे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रुग्ण नाकारणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांवर उपचार केले जातात. परिणामी वर्षभर लागणाऱ्या औषधे व इंजेक्शनचा साठा पाच ते सहा महिन्यातच संपुष्टात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. फॅ क्टर आठ, नऊ, सात व थिबासाठीची इंजेक्शन व औषधे ही लाईफ सेव्हिंग औषधे या सदरात मोडत असल्यामुळे त्याच्या निविदा काढण्यासाठी आरोग्य विभागाने हाफकिन संस्थेकडे नोंदणी केली होती. तथापि या निविदेच्या मागणीत काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसल्यामुळे हाफकिनने निविदा रद्द केल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर औषध खरेदीसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागण्यात आली असून या विषयावर सोमवारी प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे बैठक होणार आहे. याबाबत डॉ. व्यास यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र आरोग्य संचालक डॉ. कांबळे यांनी हिमोफेलियाच्या रुग्णांना औषधांची कमतरता पडू देणार नाही, असे सांगितले.