चालकांची मनसेकडेही धाव

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला ओला-उबर चालकांचा संप अद्यापही मिटला नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच राहिले. गुरुवारी संपाचा अकरावा दिवस असून मागण्यांसदर्भात ओला, उबर व्यवस्थापन व संघटना यांच्यात बैठक होणार आहे. दरम्यान, काही चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. न्यायालयात दाद मागूच, मात्र मागण्यांवर विचार झाला नाही तर खळखटय़ाक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून ओला, उबर चालकांनी संप पुकारलेला आहे. त्यामुळे ओला,उबर सेवा जवळपास ठप्पच झाली आहे. बुधवारीही आंदोलन सुरूच राहिल्याने प्रवाशांना ओला, उबरची सेवा उपलब्ध होत नव्हती. त्यांच्या अ‍ॅपवर मिनी, शेअर, प्राईम, टॅक्सी, मायक्रो या विविध प्रकारांतील सेवा उपलब्धच होत नव्हत्या. अ‍ॅप सुरू करताच यातील एखादीच सेवा अ‍ॅपवर १५ ते २० मिनिटानंतर उपलब्ध होत असल्याचे दिसत होते. त्यामुळे या सेवेचा नियमित वापर करणाऱ्या प्रवाशांनी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडले.

दरम्यान, गुरुवारीही संप सुरूच राहणार आहे. दुपारी ओला, उबर व्यवस्थापन व संप पुकारलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ, मराठी कामगार सेना यांच्यात बैठक होईल.

दहाव्या दिवशीही संप सुरूच आहे. कोणताही तोडगा निघाला नसून गुरुवारी ओला, उबर व्यवस्थापनासोबत संघटनांची बैठक होणार आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उग्र आंदोलन केले जाईल आणि त्याची जबाबदारी ओला, उबर व्यवस्थापनाची असेल.

– महेश जाधव, अध्यक्ष, मराठी कामगार सेना