पावसाच्या तडाख्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाढत्या कचऱ्यामुळे बकाल होत असलेली मुंबई, आरोग्य यासह मुंबईच्या विकासाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेच्या समन्वय समितीची सोमवारी होणारी बैठक  रविवारी अचानक रद्द करण्यात आली. मुंबईचा बोजवारा उडविणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची या बैठकीत मुख्यमंत्री झाडाझडती घेणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे शिवसेनेने ३६ मुद्दय़ांवर सरकारवरच हल्लाबोल करण्याची तयारी केली होती.
मुंबईला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेची समन्वय बैठक आयोजित करण्याची प्रथा आहे. मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये एकदाही समन्वय बैठक झाली नव्हती. यंदा पावसामुळे मुंबई खड्डेमय झाली आमि रस्ते खड्डेमुक्त करण्यात पालिका अपयशी ठरली. त्यातच मुंबईच्या विकासाचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १२ ऑगस्टला समन्वय बैठक आयोजित केली होती.
अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकारकडे बोट दाखवून टीका करणाऱ्या शिवसेनेची पृथ्वीराज चव्हाण झाडाझडती घेणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी शिवसेनेनेही ३६ मुद्दे तयार ठेवले होते. परिणामी ही बैठक वादळी होण्याची अधिक शक्यता होती. मात्र अचानक ही बैठकच रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली.