सिग्नल्स, रेल्वे रूळ आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी आज (२ फेब्रुवारी) रेल्वेच्या पश्चिम मार्गावर जंबो, तर मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत असून, ब्लॉक काळात चिंचपोकळी व करी रोड येथे लोकल थांबणार नाहीत. पश्चिम मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात लोकल जलद मार्गावरून धावणार आहेत. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी या दोन्ही दिशेकडील मार्गावर लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर भायखळा-विद्याविहार दरम्यान सकाळी १०.४२ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात भायखळा स्थानकातून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धिम्या लोकल विद्याविहारपर्यंत जलद मार्गावरून धावणार आहेत. दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर या लोकल थांबणार असून, चिंचपोकळी, करी रोड येथे या लोकल थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाईंदर ते वसई रोड या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन  मार्गांवर हा जंबो मेगाब्लॉक  घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भातली माहिती आधीच दिली. सिग्नल्स, ओव्हरहेड वायर आणि इतर यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

हार्बर मार्गावरून कुर्ला ते वाशी या दोन्ही दिशेकडील मार्गावर लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सकाळी १०.३४ पासून दुपारी ३.०८ वाजेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.