मुंबई : बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी भाजपप्रणित सरकारने कंत्राटदारांची तातडीने नियुक्ती केली खरी; परंतु कंत्राटदारांच्या कामावर देखरेख करण्यासाठी म्हाडाच्या अभियंत्यांची अद्याप नियुक्ती होऊ शकलेली नाही. या महत्त्वाच्या प्रकल्पावर नियुक्तीसाठी कोणी अभियंते इच्छुक नसल्याचेच दिसून येत आहे. मलिदा देणाऱ्या नियुक्त्यांची सवय झालेल्या म्हाडा अभियंत्यांची या पदावर नियुक्ती केली तर ती लगेच बदलून घेतली जात आहे.

या प्रकल्पासाठी शासनाने एक उपमुख्य अभियंता, प्रत्येक प्रकल्पासाठी एक याप्रमाणे तीन कार्यकारी अभियंता, एकूण नऊ उपअभियंते आणि सहा कनिष्ठ अभियंते असा कर्मचारी वर्ग म्हाडाकडे मागितला होता; परंतु केवळ तीन उपअभियंते आणि दोन कनिष्ठ अभियंते वगळले तर उर्वरित पदावर नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. नियुक्त करण्यात आल्या तरी त्या बदलून घेतल्या जात आहे. कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक यांच्याकडे तिन्ही प्रकल्पांचा अतिरिक्त कार्यभार आहे. उपमुख्य अभियंतापदाचा कार्यभार राजेश शेठ यांच्याकडे आहे. शेठ हे नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता होते आणि आता त्याच ठिकाणी उपमुख्य अभियंता आहेत. त्यांच्याकडे बीडीडी चाळ प्रकल्पांचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले.

सेवाकरार पद्धतीने नेमल्या गेलेल्या कार्यकारी अभियंत्यांपैकी एकाची नियुक्ती बीडीडी चाळ प्रकल्पासाठी करण्यात आली होती; परंतु त्यांनी ही नियुक्ती रद्द करून घेऊन मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळात करून घेतली. एकीकडे हा प्रकल्प वेगाने मार्गी लावायचा आहे असे सरकार म्हणते, तर दुसरीकडे म्हाडा अभियंते नियुक्तीसाठी इच्छुक नसताना वा झालेली बदली रद्द करून घेत असतानाही शासनाकडून काहीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.