हलकं आणि पौष्टिक काही तरी खायचं असेल तर महाराष्ट्रीय हॉटेलमध्ये जाऊ, असा विचार केला जातो. तिथे साधारणपणे पदार्थावर वेगळे प्रयोग केलेले आढळत नाहीत. मात्र, बोरिवली पश्चिमेला असलेल्या ‘मी मराठी’ या हॉटेलमध्ये नेहमीचे मराठी शाकाहारी पदार्थ तर मिळतातच, परंतु अनुभवाला कल्पकतेची जोड दिल्यामुळे मराठी खाद्य संस्कृतीमध्ये नवीन पदार्थाचीही भर घातली आहे.

‘कसादिला’ हा मेक्सिकन प्रकार. पण या मेक्सिकन प्रकाराला येथे मराठी तडका देण्यात आलाय. कसादिलामध्ये गव्हाच्या किंवा कॉर्न पिठाची रोटी घेऊन त्यामध्ये मशरूम आणि चीझ स्टफ केलं जातं. यालाच मराठी तडका देऊन त्याचं नामकरण ‘भाकरी कसादिला’ असं करण्यात आलेलं आहे. भाकरी आणि बटाटा भजी या मराठमोळ्या पदार्थाचा हा भन्नाट प्रकार. सर्वप्रथम तांदळाची भाकरी घेऊन त्यावर हिरवी मिरची, पुदिना, कोिथबिरीची हिरवी चटणी पसरवली जाते. फ्राय केलेल्या गरमागरम बटाटा भजीचे काप त्यावर मांडले जातात आणि बारीक चिरलेला कांदा पसरवला जातो. त्याउपर चटणी लावलेली आणखी एक तांदळाची भाकरी ठेवली जाते. पुन्हा एकदा थोडी कांदा-लसूण चटणी, चाट मसाला टाकला जातो. मग चीझ किसून सॉस टाकला जातो. बारीक चिरलेली कोिथबीर टाकून कसादिला सजवला जातो. भाकरीच्या आत बटाटा भजी टाकल्याने क्रिस्पी लागणारा हा कसादिला चवीलाही थोडा वेगळा आहे. मुख्य म्हणजे तांदळाच्या भाकरीमुळे त्याची पौष्टिकता वाढते. तसंच बटाटा भजीमुळे तो भरपेट पर्याय ठरतो.

हरयाली पावभाजी हादेखील असाच ट्विस्टेड पदार्थ. भरपूर प्रयोगांनंतर गेल्याच आठवडय़ात मेन्यूमध्ये दाखल करण्यात आलेला हा ब्रॅण्ड न्यू पदार्थ आहे. आपण प्रत्येकाने लाल रंगाची पावभाजी खाल्लेली आहे. ब्लॅक पावभाजीबद्दल तर याच सदरामध्ये लिहिलं होतं. मात्र पहिल्यांदाच हरयाली म्हणजेच ग्रीन पावभाजी मुंबईकरांना येथे खायला मिळणार आहे. पालक, कच्च हिरवे टोमॅटो, हिरवे वाटाणे, हिरवी शिमला मिरची आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, कांदा आणि बटाटा या सर्व वस्तूंच्या मिश्रणातून ही हिरवी पावभाजी तयार होते. भाजीला हिरवा रंग पालकमुळे येत असला तरी आपण पालक भाजी खात आहोत असं वाटत नाही. नेहमीच्या पावभाजीच्या जवळ जाणारी याची चव असली तरी हिरवे टोमॅटो आणि हिरवी मिरची यामुळे हा ट्विस्ट आपली वेगळी छाप पाडतो. विशेष म्हणजे लाल पावभाजी ही अनेकदा मसालेदार आणि तिखट लागते. ही भाजी मात्र त्याला अपवाद आहे. बटर घातलेल्या या पावभाजीत थोडं िलबू पिळल्यास त्याची लज्जत आणखीनच वाढते. त्यामुळे हा नावीन्यपूर्ण प्रयोग चाखण्यासारखा आहे.

‘मी मराठी’च्या मेन्यूमधील तोई हा प्रकारदेखील आपलं लक्ष वेधून घेतो. वरण आणि डाळीच्या पंक्तीत बसणारा हा पदार्थ वरणापेक्षा थोडा पातळ असतो. सारस्वत ब्राह्मणांच्या घरी तुम्हाला हा पदार्थ केलेला आढळेल, मात्र तो हॉटेमध्ये मिळत नाही. आलं, हिरवी मिरची आणि राई व िहगाचा तडका दिल्यानंतर तूरडाळ आणि भरपूर पाणी घालून ते व्यवस्थित उकळवलं जातं. त्याची लज्जत आणखी वाढण्यासाठी वरून िलबूही पिळलं जातं. नुसताच सूपसारखाच प्यायला आणि भातासोबत हा पदार्थ छान लागतो.

मसाला पापड हा अतिशय पॉप्युलर प्रकार. हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून किंवा जेवणासोबत मागवलाच जातो. पण इथे तुम्हाला कुठेच न मिळणारी पापडाची कोिशबीर मिळेल. कडक भाजलेल्या उडदाच्या पापडाचा चुरा, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, मिरची पावडर, चाट मसाला आणि िलबू यांना एकत्रित करून ही कोिशबीर तयार केली जाते.

मराठी थाळीमध्येही येथे तीन प्रकारच्या थाळी आहेत. पूर्णा, अन्नपूर्णा आणि गावरान थाळी. यातील गावरान थाळीमध्ये पिठलं-भाकरी, मसाले भात, वांग्याचं भरीत, मिरचीचं लोणचं आणि एक गोड पदार्थ असतो. पूर्णा थाळी ही नेहमीप्रमाणे शाकाहारी थाळी आहे. पण पूर्णा आणि गावरान थाळीचं कॉम्बिनेशन म्हणजे अन्नपूर्णा थाळी होय. यात मसाले भात, साधा, चार भाज्या, डाळ, पिठलं-भाकरी, गोड पदार्थ, फरसाणाचे दोन पदार्थ, कोिथबीर वडी, मसाला ताक असे सर्व पदार्थ असतात. ही थाळी संपवणं एका व्यक्तीचं काम नाही त्यासाठी, दोन माणसंच हवीत.

ओंकार वाघ या मराठी तरुणाच्या डोक्यातून वरील सर्व नावीन्यपूर्ण पदार्थ तयार झाले आहेत. ओंकारने रिझवी कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट केलं असून ‘मी मराठी’ सुरू करण्याआधी पंचतारांकित हॉटेलमध्येही काम केलेलं आहे. वार आणि दिवसांनुसार उपवासाचेही विशेष पदार्थ येथे मिळतात. तसंच खास देवगडहून तयार होऊन येणारं हापूस आंब्याचं आंबा सरबत आवर्जून पिण्यासारखं आहे.

मी मराठी

  • कुठे – शॉप नं. ७, व्रजदीप सोसायटी, एक्सर चंदावरकर रोड जंक्शन, बोरिवली (पश्चिम) मुंबई</li>
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी ८ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत. बुधवार बंद.