मुंबै बँकेकडून कर्ज मिळविण्यात येत असलेल्या अडचणी, तसेच अन्य अटींबाबत निर्माण झालेला संभ्रम यामुळे तब्बल नऊ महिन्यांपूर्वी सोडतीमध्ये म्हाडाचे घर लागूनही आजतागायत गिरणी कामगारांना त्याचा ताबा मिळू शकलेली नाही. त्यामुळे घराचा ताबा मिळविण्यासाठी आता आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल गिरणी कामगारांकडून उपस्थित करण्यात येत
आहे.
म्हाडाच्या सोडतीमध्ये २८ जून २०१२ रोजी ६९२५ गिरणी कामगारांना घरे लागली. त्यानंतर घरासाठी मुंबै बँकेकडून कर्ज उपलब्ध होईल, असेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे गिरणी कामगारांनी मुंबै बँकेत धाव घेतली. गिरण्यांना घरघर लागताच अनेक कामगारांनी मुंबईतील आपला मुक्काम गावाकडे हलविला. परिणामी मुंबईबाहेरील मुक्कामी असलेल्या गिरणी कामगारांना घरासाठी कर्ज देण्यात मुंबै बँकेपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अनेकांकडे आपण गिरणीत कामाला होतो याचा पुरावाच नाही. त्यामुळे संबंधित गिरणी कामगारांना मिळणाऱ्या भविष्यनिर्वाह निधीची नोंद पुरावा म्हणून समजावा अशी अट घालण्यात आली होती. त्या काळी गिरणीमध्ये सलग २४० दिवस भरल्यानंतर भविष्यनिर्वाह निधी लागू होत होता. त्यामुळे या बाबीचा अंतर्भाव अटींमध्ये करण्यात आला होता. मात्र घर लागलेल्या सरसकट सर्वच गिरणी कामगारांना ही अट लागू करण्यात आली. त्यामुळे गिरणी कामगार चक्रावले आहेत. काही गिरणी कामगारांनी घरासाठी भरलेल्या अर्जामध्ये अनेक चुका केल्या आहेत. परिणामी म्हाडाकडून त्यांना वारंवार पत्र पाठविण्यात येत आहेत. म्हाडाचे पत्र पाहून कामगारांची घाबरगुंडी उडत आहे.
 गिरणी कामगारांच्या वारसांनाही वारसा हक्क प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अखेर ही अट काढण्यात आली, परंतु त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्या कशा सोडवायच्या असा यक्षप्रश्न म्हाडासमोर निर्माण झाला आहे.
गिरणी कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात आणि त्यांना घराचा ताबा मिळावा यासाठी गिरणी कामगारांच्या विविध संघटनांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाटय़ा महात्मा गांधी सभागृहात एका मेळाव्याचे आयोजन केले होते. सोडतीत लागलेल्या घरासाठी घातलेल्या अटींची पूर्तता कशी करावी अशा विवंचनेत असलेले सुमारे एक हजार गिरणी कामगार या मेळाव्यात सहभागी झाले होते. गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ताराम इस्वलकर, राष्ट्रयी मिल मजदूर संघाटे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोलकर, प्रवीण घाग, राजन दळवी, गोसावी आदी कामगार नेते यावेळी उपस्थित होते. घर मिळविण्यात येत असलेल्या कामगारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर या नेत्यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.