राज्यभरात बहुतांश ठिकाणी शनिवारी किमान तापमान १५ अंश सेल्सियसच्या खाली घसरले तर कमाल तापमान २५ ते ३० अंशाच्या दरम्यान होते. मात्र दोन दिवसांनंतर वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडय़ात ८ आणि ९ जानेवारीस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या उत्तरेत थंडी असून, उत्तर-पश्चिम वारे आणि राज्यात बहुतांश ठिकाणी असलेले कोरडे हवामान यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत वाऱ्याची दिशा बदलून दक्षिण-पूर्व होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसर व मध्य महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर किमान तापमान २० अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील.

शनिवारी सकाळी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मालेगाव आणि सोलापूर वगळता सर्वत्र किमान तापमान १० ते १५ अंश सेल्सियस दरम्यान होते. कोकण किनारपट्टीवर १४ ते १८ अंश सेल्सियस किमान तापमान नोंदविण्यात आले. सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १०.६ अंश नोंदविण्यात आले. कोकणात किमान तापमानात सरासरीपेक्षा घट, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात किंचित वाढ झाली. उर्वरित महाराष्ट्रात तापमान सरासरी इतके होते.

वर्षांच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबई आणि परिसरात पारा घसरल्यामुळे गारठा वाढला आहे. त्याचबरोबर कमाल तापमानदेखील ३० अंशाखाली गेले आहे. मुंबई आणि परिसरातील आद्र्रतेचे प्रमाण गेल्या तीन दिवसांत कमी होत असल्यामुळेमुंबईकरांना थंडीचा अनुभव मिळाला. सायंकाळी वाहणारे थंड वारे आणि पहाटे वाढणारा गारठा मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे. शनिवारी मुंबई आणि परिसरात बोरिवली, कांदिवली, पवई, मुलुंड आणि पनवेल येथे किमान तापमान १५ अंशाखाली घसरले. तर सांताक्रूझ येथील हवामान विभागाच्या केंद्रावर कमाल तापमान २६.५ अंश नोंदविण्यात आले. रविवारी किमान तापमान १४ अंश राहण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.