तंत्रशिक्षण, कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांमुळे प्रवेश नियमन कक्षाची लाखो रुपयांची कमाई झाली आहे. विद्यार्थ्यांना मात्र आपल्या हक्काचे गुण मिळवण्यासाठी भुर्दंड सोसावा लागला आहे. यंदा चुकीच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्षेपापोटी आठ लाख रुपये जमा झाले आहेत.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या अभ्यासक्रमांसाठी ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या उत्तरतालिकेवर काही आक्षेप असल्यास नोंदवण्याची मुभा कक्षाने दिली होती. त्यानुसार यंदा ७९१ आक्षेप कक्षाकडे आले. त्यातील ४५९ हरकतींमध्ये तथ्य असल्याचे समोर आले.

नियमानुसार विद्यार्थ्यांला आक्षेप नोंदवायचा असेल तर प्रत्येक आक्षेपामागे हजार रुपये भरावे लागतात. घेतलेल्या आक्षेपांची छाननी करून योग्य वाटल्यास गुण देण्याचे जाहीर करण्यात येते. त्यानुसार यंदा ३२ दिवस झालेल्या संपूर्ण परीक्षेत ६५ प्रश्न चुकीचे असल्याचे कक्षाने स्पष्ट केले. ज्या सत्रातील प्रश्न चुकले होते त्या सत्रातील विद्यार्थ्यांना गुणही देण्यात येणार आहेत. मात्र, गुण मिळाले तरी घेतलेला आक्षेप बरोबर असतानाही विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले हजारो रुपयांचे शुल्क परत मिळणार नाही.

झाले काय?

परीक्षेची उत्तरसूची जाहीर करून कक्षाने त्यावर हरकती मागवल्या होत्या. त्यानुसार ७९१ हरकती विद्यार्थी, पालकांनी नोंदवल्या. प्रत्येक हरकतीमागे १ हजार रुपये यांनुसार ७ लाख ९१ हजार रुपये प्रवेश नियमन कक्षाच्या तिजोरीत जमा झाले. गेल्यावर्षीही जवळपास ३०० आक्षेप विद्यार्थ्यांनी नोंदवले होते. त्यानुसार ३ लाख रुपये कक्षाच्या तिजोरीत जमा झाले.

चूक कक्षाची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

* प्रवेश परीक्षेला बसताना विद्यार्थी परीक्षा शुल्क भरतात. त्याशिवाय आक्षेप घेण्यासाठीही शुल्क भरावे लागते. आक्षेप बरोबर असतानाही विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले शुल्क परत दिले जात नाही.

* कक्षाने प्रश्नपत्रिकेत चूक केल्यानंतर ती सुधारणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे गुण मिळवण्यासाठी हजारो रुपयांचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या प्रवेश परीक्षेत २० ते २५ गुणांसाठी या विद्यार्थिनीला २० हजार रुपये किंमत मोजावी लागली.

* परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांमुळे अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे होणारा मनस्तापही भोगावा लागला. या विद्यार्थिनीने २१ प्रश्नांमधील चुका दाखवून दिल्या. त्यासाठी तिला २१ हजार रुपये भरावे लागले. तिने घेतलेल्या आक्षेपांपैकी २० प्रश्नांवरील आक्षेप बरोबर असल्याचे उत्तरतालिकेवरून स्पष्ट झाले असल्याची माहिती विद्यार्थिनीने दिली.