आमदार आशीष शेलार यांचा आरोप

मुंबई : मुंबई शहरातील नाल्यांची सफाई १०७ टक्के झाल्याचा दावा फोल असून ही नालेसफाई नव्हे, तर सत्ताधाऱ्यांची हातसफाई आहे. मुंबईकरांना वेठीस धरून नालेसफाईचे दावे करणाऱ्या स्थायी समिती व महापौरांचे हे पाप आहे, असा आरोप भाजप आमदार अ‍ॅड.आशीष शेलार यांनी सोमवारी केला. नाल्यातील गाळ अतिरिक्त आयुक्त वेलारसू यांच्या घरासमोर नेऊन टाकू, असा इशारा शेलार यांनी दिला.

मुंबई शहरातील नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी अ‍ॅड. शेलार, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी पाहणी दौरा केला. यादरम्यान स्थानिक नागरिकांनीही नालेसफाईबाबत तक्रारी केल्या.  नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा कंत्राटदारांकडून बिले काढण्यासाठी केला जात आहे. महापालिका प्रशासनही त्यास साथ देत आहे.

वेलारसू यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. नालेसफाईच्या कामात जे कंत्राटदार दोषी आहेत, त्यांचा संबंध वाझे प्रकरणाशी आहे. सचिन वाझे यांनी न्यायालयाला दिलेल्या पत्रात नालेसफाईच्या कामातील कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी वसूल करायला मंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहिती उघड केली होती. या दोषी कंत्राटदारांना वाचवण्याचे काम शिवसेनेचे मंत्री करीत आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.