पाकिस्तान आणि बांगलादेशीतल घुसघोरांविरोधात मनसेने रविवारी मुंबईत मोठा मोर्चा काढला. आझाद मैदानावरील आपल्या छोटेखानी भाषणात राज ठाकरेंनी CAA ला आपला पाठींबा दर्शवत…सत्ताधारी पक्षावर टीका केली. “आज आम्ही मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मोर्चा आझाद मैदानात पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी संबोधित करताना घुसखोरांचं संकट गंभीर प्रश्न असल्याचं म्हटलं. “माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

सभा आटोपल्यानंतर मनसे सैनिकांनी आपलं सामाजिक भान राखत, सभेच्या ठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करत परिसर स्वच्छ केला.

केंद्राच्या योग्य निर्णयांची स्तुती केली –

“केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली तर भाजपाविरोधी आणि स्तुती केली तर भाजपाच्या बाजूने म्हटलं आहे. याच्या मधे काही आहे की नाही. जेव्हा चुकीचे निर्णय झाले तेव्हा त्यावर टीका केली. पण जेव्हा ३७० कलम काढलं तेव्हा अभिनंदन केलं. न्यायालयाकडून राम मंदिराला परवानगी देण्यात आली तेव्हा बाळासाहेब असते तर आनंद झाला असता असं म्हटलं होतं. राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना कऱण्याचं ठरलं तेव्हाही अभिनंदन केलं. त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभेल. आपण फुकट नाही मेलो असं त्यांना वाटेल,” असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.