बॉलिवूडमधल्या कलाकारांना भूतकाळातही गंभीर गुन्ह्यांखाली अटक झाली. त्यांना शिक्षा झाल्या पण म्हणून कुणी बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जातोय. एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवण्याचं कुटील कारस्थान रचलं जातं आहे असा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट करत भूमिका मांडली आहे. या ट्विटमुळे कधी नव्हे तो मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला आहे. कारण बॉलिवूडला इतरत्र हलवलं जाण्याचा कट आहे असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही केला होता.

आणखी वाचा- “आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट”

काल काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेतली जात आहे. बॉलिवूडमधील या वादावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मौन सोडलं. बॉलिवूडवर केल्या जात असलेल्या आरोपांवर दुःख व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात होत असलेल्या फिल्मसिटीवरही भूमिका मांडली.