महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईच्या चेंबूर येथील विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दुनबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दुनबळेंच्या राहत्या घराजवळ सिंधी सोसायटीत हा प्रकार घडला. या हल्ल्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दहा ते अकरा जणांच्या गटाने दुनबळेंवर लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला केल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. दुनबळे यांच्या डोक्याला जखमा झाल्या असून त्यांना 22 टाके पडल्याची माहिती आहे. प्रकरणाचा तपास चेंबूर पोलीस करत असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, दुनबळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गेल्या आठवड्यात मनसे चेंबूर शाखाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले होते.