शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नेत्यांची पहिलीच राजकीय बैठक शनिवारी मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतानाच मनसेसाठी शिवसेनेने दरवाजे बंद केले नसल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी बैठकीत राज ठाकरे यांचा विषय निघाल्याचे प्रसारमाध्यमांकडे मान्य केले तसेच शिवसेनेने यापूर्वी टाळीसाठी हात पुढे केला होता आता मनसे काय भूमिका घेते त्यांच्यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील असे सांगितले.
बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या शिवसेना नेत्यांच्या पहिल्या बैठकीत पक्षनेतृत्व उद्धव यांच्या हाती देण्याचा एकमुखी निर्णय झाला होता. त्यानंतर जवळपास सहा महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव यांनी सेना ही बैठक घेतली. काही दिवसांपूर्वी सेनेच्या मुखपत्रात ‘महायुतीत चौथा भिडू नको, त्यामुळे खिचडी बेचव होईल’ अशी ‘रोखठोक’ भूमिका आली होती. तसेच भाजप नेत्यांकडून राज यांच्याशी सुरू असलेल्या सलगीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याच अग्रलेखात ‘वेळ येताच पाहू’ अशी संदिग्ध ‘लाइन’ही मांडण्यात आली होती. त्यामुळे सेनेने मनसेला दरवाजे बंद केले नाहीत असे सेनेच्या नेत्यांचेही मत बनले होते. शनिवारच्या बैठकीत राज ठाकरे व भाजप नेत्यांच्या सलगीसह एनडीएनमधून नीतिश कुमार बाहेर पडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील शिवसेना लढत असलेल्या लोकसभेच्या जागांचा आढवा तसेच पक्षांतर्गत बदलांवर चर्चा झाली. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत घेतलेल्या भूमिकेवर विचार झाला. मात्र या बैठकीत महायुतीत मनसे नको किंवा हवी अशी कोणतीही चर्चा झाली नाही असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. या नेत्याच्या सूचक विधानानुसार राजकारणात कोणीच अस्पृश्य नसतो आणि लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे!