पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात ९ फेब्रुवारीला मोर्चा

मुंबई : पाकिस्तान आणि बांगलादेशातून लाखो मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली असून, त्यांना हाकलून देण्याची गरज आहे. त्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला.

मनसेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वावर भर देत पक्षाची आगामी वाटचाल जाहीर केली. मनसेच्या संपूर्ण भगव्या रंगातील आणि छत्रपतींची राजमुद्रा असलेल्या नव्या झेंडय़ाचे अनावरण राज यांच्या हस्ते झाले. या वेळी राज यांचे चिरंजीव अमित यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच कृषी, महिला, शिक्षण आदी अनेक विषयांवर पदाधिकाऱ्यांकडून ठरावही मांडण्यात आले.

मनसेच्या स्थापनेच्या वेळी ‘मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा’ अशी भूमिका मांडणाऱ्या राज यांनी अधिवेशनात ‘मी मराठीही आहे आणि हिंदूदेखील आहे’ अशी भूमिका जाहीर केली. मराठीला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि हिंदू म्हणून कोणी विरोध केला तर हिंदू म्हणून मी उभा राहीन, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, असे सांगत मशिदीवरील भोंग्यांना राज यांनी विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेथे विरोध करायचा तेथे विरोध केला. अनुच्छेद ३७० रद्द केले तेव्हा त्यांचे कौतुकही केल्याचे सांगत आपली ‘मोदी-शहामुक्त भारत’ ही भूमिका त्यांनी मवाळ केली.

भारत ही धर्मशाळा नाही. त्यामुळे येथे पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या मुसलमानांना हाकलूनच दिले पाहिजे. सध्या जे काही लोक मोर्चे काढत आहेत त्यांना मोर्चा काढूनच उत्तर दिले जाईल, असे सांगत ९ फेब्रुवारी रोजी मनसेच्या मोर्चाची घोषणा त्यांनी केली. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, बाहेरून आलेल्यांना कशासाठी पोसायचे, असा सवाल करीत बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरी हाकलण्यासाठी केंद्राला पाठिंबा देण्याची आपली तयारी असल्याचे राज यांनी सांगितले. राज्यातील सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेची ‘श्ॉडो कॅबिनेट’ स्थापन करण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले.

शिवसेनेला टोला : ‘झेंडय़ाचा रंग बदलला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो,’ असा टोला राज यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

मनसेच्या स्थापनेवेळी आपल्या पाठीशी कोणी नव्हते. सर्वसमावेशक राजकारणाची भूमिका, अनेकांचे अनेक सल्ले यातून आधीच्या झेंडय़ाची निर्मिती झाली. मात्र, आज ज्या भगव्या झेंडय़ाचे अनावरण केले त्याचेच चित्र माझ्या मनात होते. छत्रपतींची राजमुद्रा ही प्रेरणा असून, दोन प्रकारचे झेंडे तयार केले आहेत. निवडणुकीच्या वेळी इंजिनाचे चिन्ह असलेला भगवा झेंडा वापरणार आहोत.  – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष