मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ यांना दोन दिवस पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेने सर्जिकल स्ट्राईक केला, असे सांगत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर दंगल, घुसखोरी आणि नासधूस या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या हल्ल्यानंतर काँग्रेस – मनसेमध्ये वाकयुद्ध सुरु झाले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीही काँग्रेस पक्षाच्या वांद्रे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली. यामागेही मनसेचा हात असण्याची शक्यता आहे. याशिवाय, संजय निरूपम यांच्या घराबाहेर मनसेकडून होर्डिंग्ज लावण्यात आले होते. यात निरुपम यांचे व्यंगचित्र रेखाटत त्यांचा उल्लेख परप्रांतीय भटका कुत्रा असा केला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस आणि मनसेमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्या; आठवलेंचा टोला

दरम्यान, या सगळ्या वादानंतर संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. काँग्रेससारख्या राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला होतो आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. या घटनेला आता २४ तास उलटून गेले आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मनसेला पाठिंबा आहे का ते मनसेला घाबरतात, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे निरूपम यांनी सांगितले.

स्थानकांतील गाळ्यांच्या गैरवापराला चाप