16 December 2017

News Flash

मनसेचा आज चर्चगेट स्थानकावर मोर्चा!

हा ‘संताप मोर्चा’ आहे. हा मोर्चा माझा, माझ्या पक्षाचा नाही तर आपल्या सर्वाचा आहे

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: October 5, 2017 1:39 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

रेल्वे प्रशासन आणि सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. साध्या साध्या गोष्टीही हे सरकार देऊ शकणार नसेल तर सरकारचा उपयोग काय, असा सवाल करत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने चर्चगेट रेल्वे स्थानकावर काढलेल्या उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

हा ‘संताप मोर्चा’ आहे. हा मोर्चा माझा, माझ्या पक्षाचा नाही तर आपल्या सर्वाचा आहे, असे आवाहन करणारे पत्रकच राज यांनी प्रसिद्ध केले आहे. सध्या देशात एक अघोषित आणीबाणी आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, अशी मनसेची भूमिका आहे. जनतेने भाजपच्या हाती दिली. आधीच्या सरकारपेक्षा काही चांगले घडेल असा आशावाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी तो तीन वर्षांतच उद्ध्वस्त केला. सरकार आणि माणसे बदलून परिस्थिती सुस्थितीत येत नसते, त्यासाठी सरकारमधील माणसांच्या संवेदना जिवंत असाव्या लागतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही जण या मोर्चाकडे राजकारण म्हणून पाहतील. आज पुलावर चेंगरून माणसे मरण पावली. तशी ती मागे एटीएमच्या रांगेतही गेली. शेतकरी आत्महत्या करतोच आहे. आता तर फवारणीमुळेही शेतकरी मरत आहे. लोकांना बोलण्याची सोय नाही. सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे असे आवाहन केले आहे.

नव्या घोषणांच्या धुळफेकीचा तमाशा, योगाचा तमाशा, स्वच्छ भारताचा तमाशा, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’चा तमाशा, हा तमाशा यापुढेही असाच सुरू राहणार आहे. भविष्यातील गंभीर परिस्थिती टाळायची असेल तर उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन राज यांनी  पत्रकात केले आहे.

 

First Published on October 5, 2017 1:39 am

Web Title: mns raj thackerays rally mumbai railway