ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांनी केलेला विधानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं समाचार घेत इशारा दिला आहे.

“केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही. विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं. आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो, तर काय होईल. १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा,” असं एमआयएमचे पठाण म्हणाले होते. पठाण यांच्या विधानावर आक्षेप घेत मनसेनं इशारा दिला आहे.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. “ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार वारीस पठाण यांनी एक अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या वक्तव्यात मग्रुरी आहे. माज आहे. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून म्हणतात, आपण “१५ कोटी आहोत, पण १०० ला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट!” ‘१००ला भारी’ म्हणजे नेमके कोणाला हे १५ भारी पडणार? हिंदूंनाच ना! हिंदुस्थानात राहून हिंदूंनाच धमकी देतोय हा उपटसुंभ!

पठाण यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला धोक्याचा ईशारा पुन्हा एकदा खरा ठरला आहे. CAA आणि NRC विरोधात आंदोलनं करणारे मुस्लिम समुदायाचे लोक त्यांची ताकद नेमकी कुणाला दाखवत आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारीच्या महामोर्चात उपस्थित केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदूंच्या विरोधात ही असली थेरं चालू देणार नाही. महाराष्ट्र सैनिकांना अशा लोकांची थोबाडं कशी बंद करायची ते चांगलं माहिती आहे,” असं शालिनी ठाकरे म्हटलं आहे.