शांतता मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला असतानाही ठाणे शहरात या आंदोलनांला हिंसक वळण लागले. मुंबई पोलिसांनी राज यांना ताब्यात घेताच ठाण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक बनले आणि त्यांनी चंदनवाडी तसेच गोखले रोड परिसरातील तीन ते चार दुकानांवर दगडफेक केली. त्यात दुकानाच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. ठाणे शहरात टायर जाळून तर भिवंडीत वाहनांची हवा काढून महामार्गावर चक्काजाम करण्याचे प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केले.  जिल्ह्य़ात टोल नाक्यावर रास्ता रोको करण्याच्या तुरळक घटना घडल्या असून या प्रकरणी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी सुमारे चारशेहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे, कडक पोलिस बंदोबस्तामुळे महामार्गावरील वाहतूक तसेच टोलवसूली सुरळीतपणे सुरू होती. मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव, चेरपोली, किन्हवली फाटा आदी ठिकाणी रास्ता रोको केला.