मोटार ट्रान्सपोर्ट विभागाचा पुढाकार

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बाहेरील खाद्यपदार्थावर अवलंबून न राहता ताजे अन्न मिळावे, यासाठी फिरते उपाहारगृह लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कैद्यांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅनची रचना बदलून त्यात फिरते उपाहारगृह सुरू करण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयातील उपाहारगृहातील खाद्यपदार्थासह काही शिजवलेले पदार्थही पोलिसांना रास्त दरात उपलब्ध होणार आहेत.

पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचा आहार महत्त्वाचा आहे. आहार योग्य असेल तर पोलिसांवरील तणावही कमी होऊ शकतो. विशेषत: बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे खूपच हाल होतात. त्यांना ताजे खाद्यपदार्थ मिळावेत, अशी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भूमिका आहे. फिरते उपाहारगृह ही संकल्पना त्यातूनच आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांच्या सुमारे चार हजारहून अधिक वाहनांच्या देखभालीची व्यवस्था सांभाळणाऱ्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागाचे अतिरिक्त आयुक्त अतुल पाटील यांनी पोलिसांच्या व्हॅनचा चेहरामोहरा बदलून त्यात फिरते कसे करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. या विभागानेही दिवसरात्र एक करून व्हॅनचा चेहरामोहरा बदलून त्याला फिरत्या उपाहारगृहाचे स्वरूप दिले. एकावेळी आठ जण बसू शकतील अशी व्यवस्था या व्हॅनमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय ताजे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. मुख्यालयाच्या उपाहारगृहातील काही खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याबरोबरच ताजे शिजवलेले अन्न पोलिसांना मिळावे, अशी त्यामागील संकल्पना आहे. बेस्टने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेषत: बंदोबस्ताच्या ठिकाणी अशी पाच फिरती उपाहारगृहे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर उपाहारगृह सुरू करण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यालयाकडे या परवानगीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांना चांगल्या प्रतीचे जेवण व इतर खाणे मिळावे, यासाठी मोबाइल कॅन्टीनची संकल्पना राबविण्यात आली आहे. ती सध्या प्रायोगिक तत्त्वावर आहे. पोलीस व्हॅनचीच तशी रचना करण्यात आली आहे. आम्ही तशी व्हॅन तयार करून मुख्यालयाला सुपूर्द केली आहे.

अतुल पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, मोटार ट्रान्सपोर्ट विभाग