17 November 2017

News Flash

चोरलेला मोबाइल अर्ध्या तासात परत!

गेल्या आठवडय़ात ते घरात काम करत असताना खिडकीजवळ ठेवलेला त्यांचा मोबाइल चोरटय़ांनी लांबवला.

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 19, 2017 2:57 AM

पोलिसांच्या तत्परतेमुळे चोराची शरणागती

पोलिसांचा वचक कसा असावा हे स्पष्ट करणारा प्रसंग नुकताच साकिनाक्यात घडला. चोराने बॉलीवूडमधल्या साहाय्यक कॅमेरामनच्या घरातून चोरलेला महागडा मोबाइल फोन अवघ्या अध्र्या तासात चक्क घरी आणून दिला. पुन्हा चोरी करणार नाही, असे सांगत प्रकरण पुढे न वाढवण्याची विनंती केली.

बॉलीवूडचे साहाय्यक कॅमेरामन बाबूराव सनीवरपू साकिनाक्यातील संघर्षनगर परिसरातील एका इमारतीत तळमजल्यावर राहतात. गेल्या आठवडय़ात ते घरात काम करत असताना खिडकीजवळ ठेवलेला त्यांचा मोबाइल चोरटय़ांनी लांबवला. त्यांनी तातडीने साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्या कानावर हा प्रकार घातला. धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. बाबूराव यांच्या इमारतीचे सीसीटीव्ही चित्रणही पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यात दिसणाऱ्या चोरटय़ाची छायाचित्रे खबऱ्यांना दाखवली.

इकडे चोरालाही आपले छायाचित्र पोलिसांच्या हाती लागल्याचा सुगावा लागला. आता आपल्याला अटक होणार याची जाणीव होताच धास्तावलेल्या चोराने  बाबूराव यांच्या घरी जाऊन मोबाइल परत केला. तक्रारदार बाबूराव यांनी फोन मिळाल्याने तक्रार केली नाही.

‘मी जेवण करण्यासाठी घरी आलो. तितक्यात एक अनोळखी तरुण दारावर आला व त्याने मला मोबाइल दिला. मोबाइल चोरणारा माझा मित्र आहे. त्याचे नाव पोलिसांना समजले आहे. ही कुणकुण लागताच त्याने हा फोन परत केला आहे. समोर यायला घाबरतो म्हणून मला पाठवले आहे, असे तो सांगू लागला. मी आग्रह करून मोबाइल चोरणाऱ्या तरुणाला भेटलो. त्याने माझे पाय पकडले, पुन्हा चोरी करणार नाही, असे सांगितले. म्हणून मीही त्याची तक्रार केली नाही. परंतु या प्रकरणात पोलिसांची तत्परता दिसून आली,’ अशा शब्दांत बाबूराव यांनी पोलिसांचे आभार मानले.

First Published on May 19, 2017 2:28 am

Web Title: mobile robbery police