राज्यातील सर्वच शहरांमध्ये अनधिकृत मोबाईल टॉवर असून त्याचे सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या टॉवर्सवर कारवाई केली जाईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
 अकोला शहरात इंडस कंपनीने उभारलेल्या अनाधिकृत मोबाईल टॉवर्सबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना पाटील यांनी ही घोषणा केली. तसेच अकोला महापालकेने या टॉवरच्या उभारणीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणाची दोन महिन्यात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मोबाईल टॉवरबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने पॉलिसी जाहीर केली त्या विरोधात काही टेलिफोन कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.